सातारा – शारदीय नवरात्रोत्सवास उद्या, दि. 7 पासून सुरुवात होणार असून, गुरुवारी घटस्थापना होत आहे. जिल्ह्यात आदिशक्तीचा जागर होणार असून, यंदा हा उत्सव आठ दिवसांचा आहे. शासनाच्या आदेशानुसार काही निर्बंधांसह जिल्ह्यातील धार्मिक स्थळेही घटस्थापनेपासून दर्शनासाठी खुली होत आहेत. देवीच्या स्वागतासाठी महिला व भाविकांनी घट, पूजा साहित्य खरेदीसाठी बुधवारी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.
सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंदिरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात येत होती. अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाईदेवी, मंगळवार तळ्यावरील तुळजाभवानी, व्यापारी पेठेतील वैष्णोदेवी, भवानी पेठेतील कालिकादेवी, शेंद्रे येथील तुळजाभवानी आदी मंदिरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि भाविकांना दर्शन घेताना सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार नाही.
त्याचबरोबर मांडवाचा आकार, मूर्तीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांची नेमणूक आदी बंधने घालण्यात आली आहेत. देवी आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना, रुद्राभिषेक, नित्य पूजा, आरती, काकडआरती व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ललिता पंचमी, अष्टमी व नवमीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. औंध येथील मूळपीठ यमाई देवीच्या मंदिरातील शारदोत्सवाचे विशेष आकर्षण जिल्ह्यातील भाविकांना असते. करोनामुळे गेली पावणेदोन वर्षे राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद होती.
ती उद्यापासून खुली होणार असल्याने यमाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होणे अपेक्षित आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. सातारा शहरात दुर्गादेवीचे स्वागत अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने होणार आहे.
मंदिरांचे पुजारी, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लसीकरण झाले आहे का, याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. घट, माती, नाडापुडी, धान्य, फुले आदी साहित्याच्या खरेदीसाठी मोती चौक, राजवाडा परिसरातील बाजारपेठेत बुधवारी गर्दी झाली होती. अनेक जण संपूर्ण नवरात्रोत्सवात उपवास करतात. त्यामुळे खजूर, भाजणीचे पीठ, शाबुदाणा, शेंगदाणे व उपवासाचे अन्य पदार्थांच्या दुकानांमध्येही गर्दी होती.