सहा हेक्टर जागेची मागणी कागदावरच : प्रस्ताव वर्षभरापासून फायलीतच बंद
पुणे – उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सहा हेक्टर जागेची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. मागील एक वर्षापूर्वी हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यास अजून मान्यता मिळालेली नाही.
उजनी धरण परिसरात येणारे परदेशी पक्षी, विस्तीर्ण असा जलाशय, मावळतीच्या सूर्याचे पाण्यात उमटणारे प्रतिबिंब आदी गोष्टींचे मनोहरी सौंदर्याचा आनंद पर्यटकांना घेता येण्यासाठी येथे पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय “एमटीडीसी’ने घेतला. या परिसरात पर्यटक निवास, वृदांवन गार्डन, वॉच टॉवर, टेन्ट हाऊस, बोटिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रोजगारच्या संधीही स्थानिक नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
उजनी धरण परिसराला अनेक पर्यटक दरवर्षी भेट दिसतात. उजनी धरण हे पर्यटकांचे हक्काचे ठिकाण व्हावे, याठिकाणी पर्यटक येऊन येथील नवनवीन गोष्टींची माहिती त्यांना व्हावी, यासाठी विशेष असे प्रयत्न होताना दिसत नव्हते. उजनी धरण पर्यटकांसाठी नवे डेस्टिनेशन होण्यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला. त्यासाठी जलसंपदा विभागाकडे असलेल्या जागेची मागणी करण्यात आली. ही जागा नाममात्र दराने उपलब्ध व्हावी, असे हा प्रस्तावात म्हटले. मात्र, प्रस्तावावर काहीच हालचाली होताना दिसत नाही.
स्कुबा डायव्हिंगचाही प्रस्ताव
उजनी धरणात अनेक ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर जुने वाडे, पूलही पाण्याखाली गेले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी काही मंदिरांचे कळस दिसतात. धरणातील पाणी कमी होत गेल्यास साधारणपणे मे मध्ये ही मंदिरे संपूर्ण दिसतात. संपूर्ण धरणात पाणी असतानाही ही मंदिरे आणि वाडे पाहता यावेत, यासाठी या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात येणार आहे.