मनगाभारा – उन्हाळी दुपार प्रतीक्षेतील (भाग २)

अरुणा सरनाईक 

निसर्गात अंत नाही. नव्यानं उमलत जाणं हा त्याचा निजधर्म आहे. लयाला जाऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं यालाच निसर्ग मानावं असं मला वाटतं. युगापासून सूर्याविषयीचे पृथ्वीचे आकर्षण याचे गुज एकदम उकलले आणि निसर्गाच्या विराटत्वाची ओळख नव्यानं पटली ती एका उन्हाळ्याच्या दुपारच्या सोसलेल्या तगमगीनंतर… एका कंटाळवाण्या प्रतीक्षेनंतर! दुपार कंटाळवाणी जरूर आहे, पण त्यातही एक शिकवण लपलेली आहे. आत्ममग्नता हा तिचा गुणधर्म तो ती आपल्याला शिकवते! आयुष्याचा लेखाजोखा विचारात घ्यायला भाग पाडते. प्रत्येक तुतील दुपार तुम्हाला वेगळा अनुभव देते. तो घ्यायला तुम्ही तयार असायला हवं!

सारी दुपार श्रांत असते. बंद दाराच्या आड कुलर्स असतात, शीतपेयानं भरेलली फ्रीजं असतात. रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरकत नाही. दूरवर एखादा लाल माठवाला कुल्फीवाला दिसला तर दिसतो. पण त्याची कुल्फी घ्यायला आजकाल मुलं धावतं नाहीत. ती घरातचं बसून टीव्ही पाहात फ्रीजमधल्या थंड पदार्थांचा आस्वाद घेतात. झाडंझुडुपं कसाबसा उन्हाचा मारा सोसत तग धरून बसल्यासारखी दिसतात. वारा इतका पडलेला असतो की झाडाची पानं हलत नाहीत, ती चित्रातल्या झाडासारखी दिसतात. स्टील फ्रेम सारखं खिडकीतून दिसणारं बाहेरचं चित्र असतं.

रस्त्यावर तुरळक वर्दळ असते. पण तिला पाहून असं वाटतं की, कोणीतरी जबरदस्तीनं त्यांना ही काम करायला भाग पाडलेलं आहे. स्तब्धं राहणं हाच जणू तिचा, दुपारीचा स्थायीभाव! इकडे म्हणजे नागपूरकडे डोंगरकडे दृष्टीस पडत नाही, पण जिथे काही प्रमाणात आहेत ते दुपारच्या वेळेस असेच स्तब्ध असतात. अगदी अनादी काळापासून ही दुपार अशीच असते का? असं कुणाला तरी विचारावसं वाटतं.

दुपार ढळू लागल्यावर जरा वातावरणात हालचाल सुरू होते. एक चहाचा कप तुमच्या हालचालींना जिवंतपणा देतो. झाडं देखील आळोखेपिळोखे देत चला आता संपली दुपार असा निःश्‍वास टाकतात. अचानक कुठून तरी हलक्‍या वाऱ्याच्या झुळका सुरू होतात. भलेही त्या उष्ण का असेना पण झाडांच्या पानांना हलवू लागतात. देवळाबाहेरचे पिंपळ पुन्हा सळसळू लागतात. आकाशात पश्‍चिमेकडे लगबग सुरू होते. सूर्याच्या तेजस्वी शुभ्र वर्णाचे आता केशरी रंगात रूपांतर होऊ लागते.

हा केशरी रंग! किती म्हणून त्याचा देखणेपणा वर्णावा कोणत्याच प्रख्यात कारखान्यातील किंवा कोणत्याही ब्रॅन्डमध्ये म्हणा हा केशरी रंग तुम्हाला सापडणार नाही. परवा सहजच ऑफिसमधून घरी परत जाताना ह्या केशरी रंगाचे अप्रुपतेचे दर्शन घडले आणि मन लोभावून गेले. आपण चित्रकार असतो तर निश्‍चितच हे दृश्‍य कागदावर रेखाटले असते. नकळत कविवर्य कुसुमाग्रज आठवून गेले. त्यांनी अशी निसर्गचित्र आपल्या कवितेत बंदीस्त केलेली आहेत. ते तर शब्दचित्रकार होते. हे दृश्‍य पाहून त्यांच्या कविता आठवल्या म्हणून मी स्वत:लाच शाबासकी दिली. त्यांचे पृथ्वीचे प्रेमगीत नव्याने स्मरले. काही ओळी अजूनही आणि केव्हाही घायाळ करतात. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्‌ मला ज्ञात मी एक धुलीकण! अंलकारिण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण! गमे की तुझ्या रूद्र ओठातील आग प्यावी! मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा!! शेवटची ओळ खरंच मनाला जखमी करून जाते.

पृथ्वीच्या सूर्याविषयीच्या भावना नव्यानं जाणवतात तिचं वाट बघणं आपल्याला धीर देतं. निसर्गात अंत नाही. नव्यानं उमलत जाणं हा त्याचा निजधर्म आहे. लयाला जाऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं यालाच निसर्ग मानावं असं मला वाटतं. युगापासून सूर्याविषयीचे पृथ्वीचे आकर्षण याचे गुज एकदम उकलले आणि निसर्गाच्या विराटत्वाची ओळख नव्यानं पटली. ती एका उन्हाळ्याच्या दुपारच्या सोसलेल्या तगमगी नंतर एका कंटाळवाण्या प्रतीक्षेनंतर! आणि क्षणात माझी मनोवृत्ती पालटली! दुपार लांबलचक नाही तर आत्ममग्न, नव्या नव्या कल्पना सुचविणारी नवा दृष्टिकोन देणारी अशी असते. ती तर माझी सखी दुपार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.