पिंपरी – पिंपरी ते निगडी मेट्रोच्या विस्तारीत मार्गासाठीचा फेरप्रस्ताव गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकारडे धूळखात पडला आहे. त्यामुळे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या चालू कामातच निगडीपर्यंत विस्तारित मार्ग तयार होण्याची शक्यता मावळू लागली आहे. परिणामी नागरिकांना या मार्गासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडी मार्गावर सलग मेट्रोमार्ग केल्यास निगडीपर्यंतच्या प्रवाशांची सोय होईल. तसेच निगडी ते स्वारगेट या मार्गावर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे पहिल्या टप्यातच निगडीपर्यंत मेट्रो करण्याची मागणी पिंपरी चिंचवडकरांनी केली होती. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाने महापालिका प्रशासनाने मेट्रोकडून चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूलापर्यंत 4.413 किलोमीटर अंतराचा डीपीआर तयार करून घेतला.
त्यासाठी 1 हजार 253 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यानंतर तब्बल 20 महिन्यांनी नागरी व्यवहार मंत्रालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये याला मंजुरी दिली. मात्र वीसऐवजी फक्त दहा टक्के निधी देण्याचे मान्य केले. तो निधी 125 कोटी इतका आहे. नवीन धोरणानुसार फक्त 10 टक्के अनुदान दिले जाणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. त्यामुळे निधीअभावी मार्गाची कार्यवाही रखडली होती. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य शासनाने उर्वरित खर्चाची जबाबदारी उचलली.
राज्य शासनाने खर्चामध्ये कपात करत 946 कोटी 73 लाख रुपयांवर खर्च आणला. तसेच महापालिकेचा 122 कोटी व राज्य शासनाचा 79 कोटी 40 लाख रुपयांचा निधी समभागाऐवजी अनुदान स्वरूपात असणार आहे. याबाबतचा सुधारित प्रस्तावही महापालिका सभेत मे 2021 मध्ये मंजूर करून राज्याकडे पाठवण्यात आला. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर तो केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला आता मे महिन्यात वर्ष पूर्ण होऊनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.