अवसरी -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील दुकाने शुक्रवार (दि. 10) पर्यंत बंद राहणार आहेत. मंचर परिसरात करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून अवसरी खुर्द गावातील अत्यावश्यक सेवेतील दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच संगीता शिंदे यांनी सांगितले.
अवसरी खुर्द आणि मंचर शहर यांची सीमारेषा एकच असल्यामुळे बुधवार, गुरुवार व शुक्रवार या कालावधीमध्ये फक्त दवाखाना व औषधांची दुकाने सकाळी 9 ते 2 या काळात उघडी राहणार असून बाकी दुकाने बंद ठेवावीत, अन्यथा दुकानमालकांकडून 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक वैद्यकीयसेवेशिवाय घराबाहेर पडू नये. गावातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी वगळता कुणालाही गावांमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.