दुधिवरे खिंडीत “सेल्फी’ टाळा

खिंड बनली धोकादायक; दरड कोसळण्याची भीती
लोणावळा  –
लोणावळा-पवनानगर-पौड मार्गावरील डोंगर पठारावर पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि सध्या सेल्फी पॉईंट बनलेली दुधिवरे खिंड अत्यंत धोकादायक झाली आहे. खिंडीत यावर्षी कोणत्याही क्षणी मोठी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे खिंडीत सेल्फी व छायाचित्र काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

मागील काही वर्षांपासून सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून प्रवास करावा लागत आहे. खिंडीतील दरड संकट दूर करण्यासह खिंडीच्या रूंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षापासून नागरिक करत आहे. मात्र अद्याप संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येला गांभीर्याने घेतलेले नाही. तसेच खिंडीत अद्याप कोणतेही धोका दर्शक सूचना फलक लावले नसल्याने पर्यटक येथे जीवाची पर्वा न करता बिनदास्त छायाचित्र व “सेल्फी’ काढतात.

लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर लोहगड, विसापूर किल्ला व पवना धरणाकडे जाताना लोणावळा-पवनानगर-पौड या राज्य मार्गावर दुधिवरे गावच्या हद्दीत दुधिवरे खिंड आहे. ही खिंड डोंगर पठारातून गेलली असून, अतिशय अरुंद व सुमारे दोनशे फुटांपेक्षा उंच आहे. खिंडीच्यावर मोठं मोठी झाडे व वृक्ष आहे. लोणावळा आणि पवनाधरण परिसराच्या मध्यभागी उंच डोंगर पठारावर ही खिंड असल्याने या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे मागील काही वर्षांपासून खिंड अत्यंत धोकादायक बनली आहे. या खिंडीत तिन्ही ऋतूत विशेषतः पावसाळ्यात ऊन पावसामुळे सैल झालेले दगड गोटे व ढिसूळ मुरूम-माती, लहान मोठी झाडे यांच्यासह लहान मोठया दरडी कोसळतात. यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.