जिल्हा प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
अपघात रोखण्यासाठी साईडपट्ट्या तातडीने भरा
पुणे – खेड-शिवापूर येथे डोंगरफोडीमुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाण्यास जागा नसल्याने या पाण्यात अडकून पडलेल्या मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पावसाळ्यापूर्वी महामार्गालगत खोदाईमुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित करण्यात याव्यात. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मदत होईल. तसेच सर्व रस्त्यांच्या साईड पट्ट्या भरून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
महामार्गांच्या कडेला पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने पाणी रस्त्यावर साचते. पर्यायाने या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठीची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यामध्ये बांधकाम विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
रस्ते, पूल, मोऱ्या आणि दरडी कोसळण्याच्या ठिकाणांची संभाव्य यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटर टॅंकर्स, डंपर्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, लाईट, आरसीसी कटर आदी साहित्यांची निगा राखण्यात यावी. तसेच ते चालू स्थितीमध्ये आहेत, याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व संबंधितांचे मोबाइल नंबर, कार्यालयातील फोन नंबर आदी माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.