पावसाळ्यात टाळा नॉन-कोविड आजार

भारतातील पावसाळा ऋतूदरम्यान विभिन्न समुदाय कापणी हंगाम साजरा करतात. असाच एक महत्त्वपूर्ण सण आहे ‘बेहदिएनख्लम’, जो मेघालयमध्ये जुलै महिन्यात शुद्धीकरण विधी म्हणून साजरा केला जातो. 

या सणाच्या नावाचा अर्थ असा आहे की ‘कॉलरा राक्षसाचा पाठलाग’. मान्सून दिलासादायक व नयनरम्य वातावरणासोबत अनेक आजारदेखील सोबत घेऊन येतो, ज्यामध्ये संसर्गजन्य आजार देखील आहेत. म्हणून सल्ला आहे की सावधगिरी बाळगत पावसाचा आनंद घ्या. शेवटी, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.

अन्न व पाण्यामार्फत होणारे आजार – घरी ताजे शिजवलेले अन्न सेवन करणे हा आरोग्यदायी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पाणी उकळून किंवा गाळून पिणे अत्यंत आवश्‍यक आहे. वारंवार हात स्वच्छ धुवायला विसरू नका. अन्यथा हिपॅटायटिस ए, कॉलरा, विषमज्वर व अतिसार हे आजार होतात.

दूषित पाणी पिणे आणि अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले जंक फूड सेवन केल्याने देखील शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. पोटासंबंधित आजार व ताप आणि काही केसेससंदर्भात हिपॅटायटिस ए, ऍक्‍यूट लिव्हर फेल्युअर असे गंभीर आजार होऊ शकतात.

मलेरिया व डेंग्यू – मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचते आणि ते दीर्घकाळापर्यंत साचून राहू शकते. ही स्थिती डासांची निर्मिती होण्यासाठी अगदी अनूकूल आहे, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार होऊ शकतात. डेंग्यू आजारामध्ये तुमच्या शरीरातील रक्‍तामधील प्लेटलेट्‌स कमी होतात आणि वेळेवर यावर उपचार न केल्यास मृत्यू ओढावू शकतो.

कीटकांपासून संरक्षणासाठी मॉस्क्विटो रिपलण्ट्‌स, मच्छरदाण्या उत्तम पर्याय आहेत. सायंकाळपूर्वी दरवाजे व खिडक्‍या बंद करण्याचा पर्यायही उपयुक्‍त आहे. रोप लावलेल्या भांड्यामधील पाण्याचा निचरा करा आणि घरामध्ये पाणी साचू देऊ नका.

सामान्य फ्लू व व्हायरल ताप – हवेमार्फत पसरणारे हे आजार सामान्यत: वर्षभर असतात. पण पावसाळ्यादरम्यान या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होते.

हवेमध्ये उच्च प्रमाणात ओलावा निर्माण होत असल्यामुळे सूक्ष्मजीवांना विकसित होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते, ज्यामुळे आजारांमध्ये अधिक वाढ होते. काही लक्षणे आहेत ताप, घसा खवखवणे, नाक गळणे, डोळ्यांमधून पाणी येणे. पावसामधून घरी परतल्यानंतर जंतू दूर करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा.

आरोग्यदायी आहार सेवन – अनेक आजार टाळण्यासाठी ताजे व आरोग्यदायी अन्न सेवन करणे आवश्‍यक आहे. सफरचंद, जांभूळ, लिची, मनुका, चेरी, पीच, पपई, पेअर्स व डाळिंब यांसारखी ‘हंगामी फळे’ पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम सप्लीमेण्ट्‌स आहेत.

तसेच आरोग्यदायी व पोषक सूप्सचे सेवन करा, तळलेल्या स्नॅक्‍सच्या जागी मक्‍याचे कणिस, डिमसम्स, स्प्राऊट्‌स भेळ अशा भाजलेल्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे ब्लोटिंग (गोळे येणे) टाळण्यामध्ये मदत होऊ शकते. लिंबू, मधासह बनवलेली हर्बल चहा आणि आले, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस इत्यादींपासून बनवलेला काढा सेवन करत शरीर उत्तेजित करा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.