मेखळीतील महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

युवकाचा प्रताप : लाइनमनला धमकाऊन काढले बाहेर

डोर्लेवाडी- मेखळी (ता. बारामती) ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगूनही तुम्ही घरपट्टी भरली नाही, असे सांगून एका तरुणाने गावातील पाच गावांसाठी 33/11 केव्ही उपकेंद्र असलेल्या सबस्टेशनमध्ये असलेल्या लाईनमला धमकाऊन बाहेर काढले व कार्यालयाला टाळे ठोकून तो युवक निघून गेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. तर लाइनमने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार असल्याचे सांगितले.

गणेश पांडुरंग धायगुडे (रा. मेखळी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे, तर लाइनमन अनिल सपकळ यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, मेखळी गावातील महावितरणचे 33/11 केवी उपकेंद्र मधील मशिनची देखभाल करून विद्युतपुरवठा सुरू केला आहे का याबाबत सपकळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तपासणी करीत होते, त्यावेळी गणेश धायगुडे हा उपकेंद्रांमध्ये आला व तुम्ही मेखळी ग्रामपंचायतची घरपट्टी बऱ्याच वेळा सांगून सुद्धा भरली नाही, आता तुमच्याशी काही बोलायचे नाही, तुम्ही कार्यालयाच्या बाहेर व्हा, असा दम देत सपकळ यांना कार्यालयाच्या बाहेर काढून सरकारीकामात अडथळा आणत कार्यालय बंद करून कार्यालयाच्या मागील व पुढील दरवाजाला टाळे ठोकले.

याबाबत चौकशी करण्यासाठी सपकळ यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यावेळी गणेश धायगुडे ग्रामपंचायतीमधील अथवा सरकारी, खासगी नोकरदार नसल्याचे ग्रामसेविका सुजाता आगवणे यांनी सांगितले. त्यानंतर सपकळ यांनी बारामतीतील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता प्रशांत गवसणे यांना घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याच्या सूचना केल्यानंतर तक्रार दाखल केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. दरम्यान, काही नागरिकांच्या सांगण्यावरून संबंधिताने कार्यालयाचे टाळे उघडले आहे. दरम्यान, टाळे उघडत असताना पोलिसांनी त्याला का पकडले नाही? असा सवालही आता उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)