अविरत सेवाव्रती… डॉ. अरूण बुरांडे

पुणे – उपचारांद्वारे रुग्णाला जीवनदान देणाऱ्या डॉक्‍टरांचे महत्त्व अनन्यसाधारणच. काळाच्या ओघात डॉक्‍टरीपेशा बदलला असला, त्याला नवे आयाम लाभले असले, तरी आजही असंख्य डॉक्‍टर्स सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आदिवासी, तसेच ग्रामीण भागात सुशृषा करणारे, मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्यसेवा देणारे डॉक्‍टर्स व त्यांच्या सेवाभावी संस्था आजही सेवारत आहेत. आरोग्यसेवेचा ध्यास घेणारे हे डॉक्‍टर त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देत आहेत. काहींनी मोठे यश संपादन केले आहे, तर काहींनी आदर्शवत्‌ कार्याचा वस्तुपाठच घालून दिलेला आहे. नीतिमूल्ये सांभाळून आणि सामाजिकतेद्वारे अविरत अंशश्रद्धा निर्मूलनाचे सेवाव्रत जोपासणारे भोर शहरातील नागोबा आळीतील एमबीबीएस, एम. एस. (जनरल सर्जन) डॉ. अरूण दिगंबर बुरांडे.

व्यवसायाने डॉक्‍टर असल्याने रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवेची जी संधी मिळाली, ती त्यांनी पूर्ण केलीच; पण त्या पलीकडे त्यांनी दालने उघडली. त्यांच्या जीवनावर व विचारसरणीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तोच वारसा घेऊन डॉ. अरुण बुरांडे हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. वैद्यकीय पदवीनंतर 1984 ते 2011 गट “अ’ वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव, कुंजीरवाडी, चाकण, तळेगाव ढमढेरे, भोर आणि ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावली. 2011 ते जून 2013 वर्ग “1′, सर्जन शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात सेवा केली.

भोर येथे रुग्णसेवेसाठी 26 जानेवारी 1997 मध्ये बुरांडे हॉस्पिटलची स्थापना केली. त्याचे उद्‌घाटन डॉ. अरुण बुरांडे यांचे गुरू स्व. डॉ. मेहरू जाल मेहता (कॅन्सर सर्जन) आणि डॉ. जाल मेहता (कुष्ठरोग सर्जन) यांच्या हस्ते झाले. शासकीय रुग्णालयातील काम, सामाजिक काम सांभाळून रुग्णालयाचे काम पाहिले. तेव्हापासून अद्याप 95 टक्‍के काम त्यांच्या सहचारिणी डॉ. सौ. विद्या बुरांडे याच पाहतात. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. बुरांडे यांना सौ. बुरांडे यांची तोलामोलाची साथ असून सर्वांना ऊर्जा देणारी आहे, असे डॉ. बुरांडे आवर्जून सांगतात. वंचित, पीडित घटकांतील रुग्णांना सेवा मिळावी, हाच उद्देश ठेवून डॉ. बुरांडे यांनी हॉस्पिटलची स्थापना केली. 24 वर्षांत हजारो लोकांनी शस्त्रक्रिया, आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, सोनोग्राफी, क्ष-किरण, प्रयोगशाळा सुविधांचा लाभ घेतल्याचे समाधान आहे, असे डॉ. विद्या बुरांडे यांनी सांगितले. बुरांडे दाम्पत्याच्या वसा त्यांच्या मुलांनीही जोपासला आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. आशिष हे मेरीटने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ग्रॅंट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एमबीबीएस (प्रथम श्रेणी) झाले आहेत. पुणे येथून प्रथम श्रेणीत डी. जी. ओ. (स्त्रीरोगतज्ज्ञ) व शिलॉंग (भारत) येथून प्रथम श्रेणीत डी. एन. बी. उत्तीर्ण झाले आहे.

स्त्रियांच्या बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण जागतिक कीर्तीचे पुण्यातील सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्याकडे ते सध्या घेत आहेत. डॉ. बुरांडे दाम्पत्याची कन्या कल्याणी अरुण बुरांडे या मेरीटने सीओइपी पुणे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमधून 84 टक्‍के गुण मिळवून बी. टेक उत्तीर्ण झाल्या असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजेमेंट (आयआयएम) कोझीकोडे (कोलकाता) येथून एम. बी. ए. पदवी प्राप्त केली असून एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून कुटुंबाचा वारसा जोपासला आहे.
सुपुत्राचा सत्यशोधकी विवाह बुरांडे दाम्पत्य हे अंनिसच्या तत्त्वाप्रमाणे जात ही अंधश्रद्धा आहे, म्हणून जात न मानणे, जातीभेद नष्ट करणे, यासाठी महात्मा फुले यांनी पुरस्कारलेल्या सत्यशोधकी विवाह करावा, या मताला प्राधान्य देतात.

आधी केले आणि मग सांगितले, या तत्त्वानुसार डॉ. आशिष बुरांडे यांचा सत्यशोधकी विवाह पद्धतीने मृण्मयी सुधीर रोकडे (बी.ई- कॉम्प्युटर), एमबीए (एचआर) यांच्याशी आंतरजातीय विवाह 21 डिसेंबर 2018 मध्ये माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्यातून त्यांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून गुणगौरव :
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट केल्याने सन 1986-87, 1987-88, 1988-89 मध्ये डॉ. बुरांडे यांना तत्कालीन आरोग्यमंत्री (स्व.) भाई सावंत, जवाहरलाल दर्डा यांच्या हस्ते स्वाक्षरीसह प्रमाणपत्रे व रोख बक्षिसांसह सत्कार करण्यात आला. कुटुंब कल्याण कार्यक्रमात सरासरी साडेसात हजार शस्त्रक्रिया केल्या होत्या. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांतील तसेच 84 प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिरांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया (दुर्बिणीद्वारे) करण्यात आली.

लोकसहभागातून दर्जेदार सुविधा :
भोर पंचायत समितीतर्फे 1992मध्ये अभिनंदनाचा ठराव दोनवेळा करण्यात आला. साथीचे रोग टाळण्यासाठी शहरासह तालुक्‍यात जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये सहकाऱ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. 1995 मध्ये लोकसहभागातून ग्रामीण रुग्णालयाचे सुशोभिकरण, रंगरंगोटी, आरोग्य सेवेच्या दर्जात वाढ केल्याबद्दल व लोकांना सरकारी रुग्णालयाकडे आकर्षित केल्याबद्दल पंचायत समितीतर्फे डॉ. बुरांडे व सहकरी यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी :
शासकीय सेवेत 1985 ते 1998 स्त्रियांची दुर्बिणीतून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया 22000 हून जास्त. अडखअ’ड थकज’ड थकज मध्ये नोंद. कार्यक्षेत्रातील संपूर्ण पुणे जिल्ह्यात काम केले. भोर तालुक्‍यात 1990 मध्ये गॅस्ट्रो/कॉलराच्या साथीमुळे हजारो लोक बाधित होत होते. 60 ते 75 दरवर्षी मृत्यू होत असत. त्यावर नावीन्यपूर्ण, स्वप्रेरणेने, महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले. पंचायत समिती भोरच्या सहकार्याने, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, दूधडेअरी अध्यक्ष व जनसामान्यांच्या सहकाऱ्याने “जन जागरण अभियान’ सुरू केले. अभियान 1990 ते 1994 अशी 5 वर्षे राबवले. 1994 पासून तालुक्‍यातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले. हेच अभियान महाराष्ट्र शासनाने 1993 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राबविले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्य :
जानेवारी 1997 मध्ये भोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. समितीचे राज्य कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांची अनेक व्याख्याने आयोजित केली. 1997 मध्ये 60 कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतली. डॉ. दाभोलकर, शास्त्रज्ञ विद्याधर बोरकर,सर्पमित्र इंगळे, तरडगावचे गायकवाड सर, कुमार मंडपे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिर 1997 पासून सलग 5 वर्षे, 800 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची शिबिरे घेत शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, लायन्स क्‍लब, बजरंग दल, राष्ट्र सेविका समिती, सर्व पत्रकारांचे सहकार्य व सक्रिय सहभाग घेऊन विसर्जित गणेशमूर्ती व निर्माल्यदान स्वीकारून मूर्ती खाणीत विसर्जन करून, निर्माल्य खतनिर्मितीसाठी कार्यक्रम यशस्वी केला आहे. अशा प्रकारे सर्वांचा सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे. त्यामुळे दाभोलकर यांनी या उपक्रमाला “भोर पॅटर्न’ असे नाव दिले.

भूषवलेली पदे :
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट “अ’ संघटना (शासन मान्य) राज्यस्तरीय कार्याध्यक्ष 1998 ते 2007
इंडियन मेडिकल असोसिएशन, भोरचे 10 वर्षे अध्यक्ष
लायन्स क्‍लब भोरचे अध्यक्ष (2008-09)
संस्थापक अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती भोर शाखा 1997 ते 2007
पुणे जिल्हा अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती (2014 पासून कार्यरत)
अध्यक्ष-भोर तालुका मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन (2016 ते 2020)

शब्दांकन भुजंगराव दाभाडे
भोर तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.