12 तालुक्‍यांत पावसाने ओलांडली सरासरी

इंदापूरमध्ये सर्वांत कमी पाऊस : परतीच्या पावसामुळे सरासरीत आणखीन वाढ होणार

पुणे – जिल्ह्यात यंदा जोरदार पावसाने इंदापूर वगळता सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम पट्टा असलेल्या मुळशी, मावळ आणि वेल्हा तालुक्‍यात तब्बल सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस झालेला आहे; पण पाण्याचे योग्य नियोजन असल्यावर येणाऱ्या उन्हाळ्यात टंचाईचा चटका बसणार नाही.

यावर्षी जून महिन्यात पावसाने वेळेत हजेरी लावली. साधारण दोन ते तीनवेळा खंड घेत चार महिन्यांत पावसाने धुवॉंधार बॅटिंग केली. मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्‍यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. तर सप्टेंबर महिन्यात दौंड, पुरंदर, बारामती, आंबेगाव आणि शिरूर तालुक्‍यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे किमान सरासरी ओलांडली. मात्र, इंदापूर तालुक्‍यात अजूनही पावसाने सरासरी पूर्ण केली नसून केवळ 89 टक्‍केच पाऊस झाला आहे. इंदापूरमध्ये सरासरी 421 मिमी पाऊस होतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत 326 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यंदा 1 जून ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत सर्वाधिक 3 हजार 784 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा अडीच हजार मिमी अधिक पावसाची नोंद करून सर्व रेकॉर्ड मोडले आहे. मुळशीमध्ये 1 हजार 517 मिमी पाऊस पडतो. तर यावर्षी 3 हजार 255 मिमी पाऊस झाला. भोरमध्ये 2 हजार 244 मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 1 हजार 161 मिमी पाऊस अधिक झाला आहे. तसेच वेल्ह्यामध्ये 2 हजार 776 पावसाची नोंद झाली. यासह जुन्नर, खेड तालुक्‍यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

15 ऑक्‍टोबरपर्यंत झालेला एकूण पाऊस
हवेली 722.73 (138.55 टक्‍के), मुळशी 3,255 (210.25टक्‍के), भोर 2,244.77 (243.21 टक्‍के), मावळ 3,784.77 (318.14 टक्‍के), वेल्हे 2,776.25 (114.73 टक्‍के), जुन्नर 1,357.77 (211.38 टक्‍के), खेड 1,311.98 (228.75 टक्के), आंबेगाव 869.9 (129.51 टक्‍के), शिरूर 422.44 (108.71 टक्‍के), बारामती 439.58 (119.33 टक्‍के), इंदापूर 326.53 (89.41 टक्‍के), दौंड 333.63 (100.45 टक्‍के), पुरंदर 684 (172.1 टक्‍के)

Leave A Reply

Your email address will not be published.