अवंतिकाची भरारी…

भारताच्या मैदानी स्पर्धांच्या क्षेत्रात पुण्याच्या अवंतिका नरळे या खेळाडूने थक्क करणारी कामगिरी करत खूप मोठी भरारी घेतली आहे. अवंतिकासारख्या उद्योन्मुख खेळाडूंचा समावेश “टॉप’ योजनेत केला गेला पाहिजे. याच खेळाडूंमधून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणारे खेळाडू गवसणार आहेत. एक पी. टी. उषा निवृत्त झाली तर तीन दशके होऊनदेखील तिची वारसदार आपल्याला मिळालेली नाही, त्याचाच शोध घेण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांमुळे तिच्याकडे भविष्यातील पी. टी. उषा म्हणून पाहिले जात आहे. पुण्यातील वडगाव शेरीमधील लोणकर माध्यमिक विद्यालयातून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. केवळ सोळाच्या वर्षीच तिच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय पदके आहेत. 11 जुलै 2003 मध्ये जन्मलेल्या अवंतिकाने आठवीत असताना मैदानी खेळाला प्रारंभ केला व केवळ दोनच वर्षात तिने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळविली. अशी कामगिरी करणारी ती पुण्याची पहिलीच खेळाडू ठरली आहे. चौदा वर्षांखालील विभागीय चाचणी स्पर्धेत तिने रीले प्राकारात सुवर्णपदक कमावताना प्रशिक्षकांचा विश्‍वास सार्थ ठरविला. आठव्या इयत्तेत असताना पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळताना तिने रीलेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले व तेथूनच तिची घौडदौड सुरू झाली.

म्हाळुंगे बालेवाडीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने पदके मिळविली आणि फेडरेशन करंडकासाठी तिची सोळा वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली. रांचीमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदकं मिळविताना स्पर्धा विक्रम साकार केला. त्यानंतर याच स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघात हॉंगकॉंगमधील स्पर्धेसाठी निवड झाली. तेथेही तिने सुवर्णपदकाला गवसणी घालताना शंभर मीटर रीलेमध्ये 11.97 सेकंदाची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याबरोबर दोनशे मीटर शर्यतीत तिला फारसे यश मिळाले नसले तरी तिच्या खात्यात रजतपदक जमा झाले. नवव्या इयत्तेतही तिने राष्ट्रीय, राज्य व शालेय राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली व राज्याची एक दर्जेदार खेळाडू बनण्याच्या दृष्टीने पावले टाकली.

नागपुरात झालेली स्पर्धा तिच्यासाठी माइलस्टोन ठरली. इथे तिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करताना शंभर मीटर शर्यतीत 11.97 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतून ती कॅडेट गटात असतानाही वरिष्ठ गटासाठी पात्र ठरली. यावेळी तिने देशाची अव्वल धावपटू धुतीचंदचा विक्रम मोडला व स्वत:चा विक्रम साकार केला. यावेळी तिची वेळ 200 मीटरमध्ये 24.60 सेकंद तर 100 मीटरमध्ये 11.67 सेकंद अशी होती. त्यानंतरच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 14 व 16 वयोगटातील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना विक्रमाची नोंद केली. सातत्याने विक्रम करताना तिने याही स्पर्धेत बेस्ट परफॉरमन्सचा पुरस्कार मिळविला. तिला लहान वयातदेखील घरून पूर्ण पाठिंबा असून याच खेळात करिअर करण्याचे व पी. टी. उषाच्या पावलावर पाऊल ठेवत देशाची प्रतिउषा बनण्याचे तिचे स्वप्न आहे. उषाच तिची प्रेरणा आहे. वडील प्लंबरचे काम करतात. मात्र, तेच तिचे प्रायोजक आहेत.

पोटाला चिमटा काढत त्यांनी तिच्या खेळासाठी आवश्‍यक ते सगळे काही करण्याचे काम सातत्याने केले असून आजही ते तिच्यासाठी धडपड करत आहेत. एकही सरकारी किंवा खासगी प्रायोजक नसताना स्पाईक, कपडे, डाएट तसेच सगळ्या सोयींसाठी तिला केवळ वडिलांचीच मदत होते. आजवर तिने पन्नासपेक्षाही जास्त पदके मिळवून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील देशाला पदके जिंकून देऊनही तिच्याकडे सरकारी स्तरावर कानाडोळाच होत आहे. क्रिकेटकडे वळणाऱ्यांनी अशा खेळाडूंसाठी देखील मदतीचा हात पुढे करायला काय हरकत आहे. तिला याच वयात प्रायोजकांनी मदतीचा हात पुढे केला तर तिचा आत्मविश्‍वास अधिक उंचावेल व खेळ देखील आणखी बहरेल.
“खेलो इंडिया’ स्पर्धेत जशी तिने अव्वल कामगिरी करत पदकांची रास ओतली तशीच कामगिरी येत्या मोसमात तिच्याकडून झाली तर पुन्हा एकदा भारतीय संघाची दारे तिच्यासाठी खुली होतील.

2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत असतानाच ज्युनिअर गटाची ऑलिम्पिक स्पर्धा देखील होत आहे यातही अवंतिकाचा कस लागणार आहे. कारण तिच्यासमोर जगभरातील अव्वल खेळाडूंचे आव्हान असणार आहे. यात ती यशस्वी ठरली तर देशाला खऱ्या अर्थाने उषाची वारसदार मिळेल. सोळा वर्षांखालील गटात ती जरी आज यशस्वी होताना दिसत असली तरी येत्या काळात तिला वरिष्ठ गटात म्हणजे अठरा वर्षांखालील गटात खेळावे लागणार असून त्यात तिला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. याच स्तरावर खेळाडूचा कस लागतो. यातूनच पुढे खेळाडूला वरिष्ठ गटात खेळण्याची संधी मिळते. इथे अवंतिका यशस्वी ठरली तरच तिला भारतीय संघाकडून सातत्याने खेळता येणार आहे. आज दर पंधरा दिवसांनी ती वेगवेगळ्या स्पर्धेत खेळते व सराव देखील अथकपणे करते.

एकीकडे पदके मिळविताना देशाकडून सातत्याने खेळण्यासाठी प्रयत्न करायचा तर दुसरीकडे तंदुरुस्तीही टिकवायची अशा कसरतीतही ती यशस्वी होते. सध्या ऑफ सीझन असला तरी तिच्या सरावात कधीही खंड पडत नाही व त्यातूनच ती तंदुरुस्ती टिकवून आहे. येत्या काळात तिला किमान दहा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळायचे असून त्यात दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे. भारताच्या युवा तसेच वरिष्ठ संघातूनही तिला खेळायचे असून देशासाठी आणखी पदके मिळवित मोठ्या गटात पात्र होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिची अशीच कामगिरी होत राहिली तर ती खरोखरच उषाची वारसदार बनेल व देशाला ऑलिम्पिक पदकदेखील मिळवून देईल, असा विश्‍वास वाटतो.

“टॉप’मध्ये समावेश व्हावा
अवंतिकाच नव्हे तर तिच्यासारख्या अनेक गुणवान खेळाडू राज्यात तसेच देशात आहेत. या खेळाडूंना “टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप) या योजनेत सहभागी करून घ्यायला हवे तरच त्यांना स्थैर्य येईल, पण सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणाही मिळेल. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही योजना सुरू केली असून त्यात देशासाठी खेळलेल्या तसेच खेळण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पण अत्यंत गुणवान खेळाडूंना सहभागी करून घेतले जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित झाली आहे. विविध जागतिक स्पर्धा, आशियाई, आफ्रो-आशियाई, राष्ट्रकुल, जागतिक, विश्‍वकरंडक तसेच ऑलिम्पिक स्पर्धा व त्यातील सरस कामगिरीची अपेक्षा पूर्ण करतील असा विश्‍वास असलेल्या खेळाडूंचा या योजनेत समावेश होतो. दरवर्षी यात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाते. जर खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत असतील तर त्यांचा करार वाढविला जातो अन्यथा त्यांना या योजनेतून बाहेर ठेवले जाते. रियो (ब्राझील) ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या साक्षी मलिकला देखील सुमार कामगिरीबद्दल या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. या योजनेत सहभागी असलेल्या खेळाडूंना प्राधिकरणाच्या नियमांनुसार मदत केली जाते. तसेच त्यांना आर्थिक पाठिंबा देखील दिला जातो. ठरावीक रक्कम देतानाच त्यांच्या खेळाचे विविध स्पर्धांमधील कामगिरीचे निरीक्षण करण्यात येते. खेळाडूने कामगिरीत सातत्य राखले तरच तो या योजनेत टिकून राहातो अन्यथा त्याला या योजनेतून वगळण्यात येते. अवंतिकाला या योजनेचा भाग बनविले तर येत्या काळात राज्यालाच नव्हे तर देशाला पी. टी. उषाची खरी वारसदार मिळेल.

अमित डोंगरे

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)