फोर्ड कंपनीच्या इन्डेव्हर या एसयूव्ही या मजबूत वाहन प्रकाराला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वाहनाची किंमत साधारणपणे 28.19 लाख ते 32.97 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
यामध्ये टिटानियम एम टी, टिटानियम प्लस एटी फोर बाय टु, टिटानियम प्लस एटी फोर बाय फोर मॉडेल्सचा समावेश आहे. ही गाडी दोन डिझेल इंजिनच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एक इंजिन 2.2 लिटर चार सिलिंडर युनिटचे आहे. यातून 160 पीएस पॉवर मिळते. दुसरे इंजिन 3.2 लिटर पाच सिलिंडर युनिटचे असून यातून 200 पीएस इतकी पॉवर मिळते.
या गाडीला एचआयडी हेडलॅम्पस् आहेत तर एलईडीचे डीआरएल आहेत. विशेष म्हणजे पावसाचा अंदाज येणारे वाइपर्स बसविण्यात आले आहेत. केबिनमधील आवाज कमी करण्याची यंत्रणा यामध्ये सक्रिय करण्यात आलेली आहे. त्यामुळे चालकाला शांततेत वाहन चालविता येते. पुढे किंवा मागे पार्किंग करताना चालकाला टचस्क्रीनवर पुरेपूर माहिती मिळते.
चालकाला गाडीबाबत व्यवस्थित माहिती मिळावी याकरिता आठ इंचाची टचस्क्रीन इन्फो सिस्टीम आहे. त्याचबरोबर दहा स्पीकर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मनोरंजनाचा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहे. या गाडीला चांगली कनेक्टिव्हिटी असून सात एअरबॅग उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या वैशिष्ट्यामुळे स्पर्धा असूनही ही गाडी भारतात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.