भारतात गेल्या दहा वर्षांपासून सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी बरीच मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंपन्यांनी अशाप्रकारचे वाहन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकारातील डब्ल्यूआर-व्ही हे वाहन होंडा कंपनीने उपलब्ध केले आहे. यामुळे या बाजारपेठेतील मोठा हिस्सा आपल्याला मिळेल, असे होंडा कंपनीने म्हटले आहे.
होंडा डब्ल्यूआर-व्हीची भारतातील सुरुवातीची सर्वसाधारण किंमत 7.75 लाख (एक्स शोरुम, दिल्ली) आहे. जपानच्या या कंपनीचे होंडा डब्ल्यूआर-व्ही वाहन होंडा जाझ प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले असून, यामध्ये होंडा सिटीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य उपलब्ध करण्यात आली आहेत. थोडक्यात, सध्याच्या जाझमध्ये काही रूपांतरण करून होंडा डब्ल्यूआर-व्ही विकसित करण्यात आली आहे.
होंडा डब्ल्यूआर-व्ही मध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये एबीएसचा आणि सर्व मॉडेलमध्ये एअरबॅग्जचा समावेश होतो. सर्वाधिक महाग व्हीएक्स ट्रीममध्ये सनरुफ उपलब्ध करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या गाड्यात हे पहिल्यांदाच होत आहे. शिवाय 7 इंचाची टचस्क्रिन चालकाच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वायफाय यंत्रणा असती तर अधिक चांगले झाले असते.
होंडा डब्ल्यूआर-व्हीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे पार्किंगवेळी बहुतांश बाजू चालकाला टचस्क्रिनवर पाहायला मिळतात. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. होंडा डब्ल्यूआर-व्ही मध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझल इंजिन असून दोन्ही इंजिनची कार्यक्षमता उत्तम असल्याचे ही कार वापरणाऱ्या ग्राहकांनी सांगितले. या गाडीचा समोरचा भाग आक्रमक वाटेल असा विकसित करण्यात आला. मोठे बंफर क्रोमचे मोठे ग्रिल उपलब्ध करण्यात आल्यामुळे गाडीची आकर्षकता व मजबुती वाढलेली आहे. गाडीची अंतर्गत सजावटही उत्तम असल्यामुळे प्रवास करणाऱ्यांना दीर्घपल्ल्यात आराम वाटतो.