पुणे – भीमा खोऱ्यातील धरणांच्या क्षेत्रात किती पाऊस झाला, पाणीपातळी काय आहे, याची अचूक माहिती घेण्यासाठी या धरणांवर स्वयंचलित रेनगेज स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यालयात संगणकावर ही माहिती मिळणार आहे. यामुळे एकाच ठिकाणी जिल्ह्यातील धरणांची स्थिती समजणार आहे. या सुविधेमुळे कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचा निर्णय घेणे सोपे होईल, तसेच धरणातील पाणी सोडण्यावर नियंत्रण ठेऊन पूरपरिस्थिती रोखण्यास मदत होणार आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि धरणाची पाणीपातळी याची अचूक माहिती जलसंपदा विभागाकडे ऑनलाइन मिळणार आहे. त्यामुळे आता धरणावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याची गरज भासणार नाही. येत्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांवर हे स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली होता.
या ठिकाणी पूरपरिस्थिती होती. या जिल्ह्यातील शेतीबरोबरच घरे, जनावरे, इतर स्थावर मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी वडनेरे समितीने सूचवलेल्या शिफारशीनुसार कृष्णा खोऱ्यातील मोठ्या धरणांवर तातडीने स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर भीमा खोऱ्यातील धरणांवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.