कुकडीच्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांचे निवेदन
कर्जत – कर्जत – जामखेड मतदारसंघातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या पाणीवाटपाबाबत यापूर्वी पाण्याचे कसलेच नियोजन नसल्याने तालुक्यात किती प्रमाणात पाणी आले आहे? त्याचे योग्य वाटप होते का? याबाबत अंदाज बांधता येत नव्हता मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी कुकडी प्रश्नासंदर्भात प्रश्न मांडले.
या चर्चेत पाण्याच्या योग्य नियोजन व वाटपासाठी ऑटोमेटिक मीटर लावण्याची मागणी केली होती. जेणे करून पाणीवाटपात पारदर्शकता येईल. त्यानुसार आता हे मीटर बसविण्यात आले असुन पाणीवाटप होत आहे.तसेच कुकडी प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. पवार यांनी जलसंपदा विभागाचे सचिव आय.एस.चहल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
नागपुर येथील अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आ. पवार यांनी कुकडीच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा केली होती. अनेक वर्षांपासून कुकडी भू-संपादनाचा तसेच चाऱ्यांच्या अस्तरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. काही प्रमाणात आमदार पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावण्यात यशही मिळवले आहे.
पाण्याच्या नियोजनासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी आणि अधीक्षक अभियंता धुमाळ यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांच्या आश्वासनानुसार कुकडी धरणातून शेतीसाठी योग्य वेळी पाणी सोडले. आणि विशेष म्हणजे नियोजनाच्या एक दिवस अगोदरच हे पाणी कर्जतला पोहोचले. आता मीटर पद्धतीने होणाऱ्या पाणी वाटपामुळे शेतकऱ्यांना समान न्याय मिळणार असून या पाठपुराव्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.
आ. पवार यांनी दिलेल्या निवेदनाचे ठळक मुद्दे
मंजूर आराखड्यातील शेवटच्या शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी चाऱ्यांच्या अस्तरीकरणाची कामे होणे आवश्यक आहे. कुकडीसाठीच्या आगामी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात यावी. कुकडी प्रकल्पासाठी भू-संपादित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. 80 गावातील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत तेही त्वरित मिळावेत. यावेळी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाचे सचिव आय.एस.चहल यांनी दिले.