वाहन कंपन्या दिवाळीबाबत आशावादी

पुणे – गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन कंपन्यांची विक्री कमी होत आहे. ऑक्‍टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी असते. त्यामुळे ही विक्री वाढावी आणि इन्व्हेंटरी कमी व्हावी याकरिता वाहन कंपन्यांनी या महिन्यात बऱ्याच सवलती दिल्या आहेत. मात्र, आगामी काळात या सवलती चालू ठेवणे शक्‍य नसल्याचे कंपन्यांनी सांगितले.

विक्री वाढावी याकरिता बऱ्याच कंपन्यांनी सूट आणि वाढीव वॉरंटी देऊ केली आहे. त्यामुळे दसऱ्यात काही वाहनांच्या विक्रीत 18 टक्‍केपर्यंत वाढ झाली. मात्र, वाहन क्षेत्राबाबत एकूणच नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून विक्री झाली नसल्यामुळे कंपन्यांचा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे अशा सवलती आगामी काळात चालू ठेवणे शक्‍य नसल्याचे मारुती सुझुकी या कंपनीचे विक्री अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.

एकतर आगामी काळात बीएस-6 या मानदंडाची वाहने विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. त्यामुळे वाहन खरेदीवेळी ग्राहक संभ्रमात पडतात. त्यातच केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांना चालना देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्याचबरोबर या वाहनांना आगामी काळात सवलती देऊन त्यांच्या किमती कमी होण्याची शक्‍यता काही ग्राहकांना वाटते. या कारणामुळे ग्राहक खरेदी लांबणीवर टाकीत असल्याचे वातावरण आहे. सप्टेंबर महिन्यातही वाहन विक्री कमी झालेली आहे.

वाहन कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे वाहनावरील जीएसटी 28 टक्‍केवरून काही प्रमाणात तरी कमी करावा अशी विनंती केली होती. यासाठी केंद्र सरकारने बराच पुढाकार घेतला होता. मात्र राज्य सरकारांचा महसूल कमी होईल त्यामुळे राज्य सरकारनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा प्रयत्न सोडून दिला. मात्र, दरम्यानच्या काळात कंपनी करात 10 टक्‍क्‍यांची कपात केली आहे. मात्र, जीएसटी कमी न केल्यामुळे वाहन कंपन्यांनी आतापर्यंत तरी वाहनांच्या किमतीत घट केलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.