पारनेर – पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले असून, तिसरा पर्याय म्हणून महाआघाडीच्या वतीने देखील अपक्ष दोन अर्ज दाखल झाले असल्याने या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पारनेर मतदारसंघात आज विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जि. प. सदस्य संदेश कार्ले व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पारनेर-नगर मतदारसंघातून आतापर्यंत 35 जणांनी 55 अर्ज नेले आहेत. सोमवारी चार जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये राणी नीलेश लंके, प्रसाद बापू खामकर, गणेश अप्पा हाके, गंगाधर हरिभाऊ कोळेकर यांचा समावेश आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी सकाळीच आपला उमेदवारी अर्ज खा. डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, माजी सभापती गणेश शेळके, सभापती राहुल झावरे, राहुल शिंदे, बाबासाहेब तांबे यांच्यासह दाखल केला.
अनेक दिवसांपासून चाललेलेल्या खलबतांतून तयार झालेल्या तालुक्यातील तिसऱ्या आघाडीच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व शिवसेनेचे नाराज जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे, बाबासाहेब हराळ, रामदास भोर, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, विलास झावरे आदी उपस्थित होते.