प्राधिकरणाने पाडले बांधकाम शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हा

पिंपरी – प्राधिकरणाने थेरगाव येथील अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आणि बांधकामधारकांनी एका शिवसेनेच्या नेत्यावर थेट आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यांची बांधकामे पाडण्यात आली त्यांनी आरोप केला आहे की, शिवसेनेच्या नेत्याने बांधकामे पाडू देणार नाही, असे आश्‍वासन देऊन चार बांधकामधारकांकडून एक लाख 20 हजार रुपये घेतले होते. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नेत्याने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता संजय देसाई यांनी फिर्याद दिली असून युवराज भगवान दाखले असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, फिर्यादी यांनी बालाजी कॉलनी, इंद्रायणीनगर, थेरगाव येथील आपले जुने घर पाडून नवीन घर बांधले होते.

बांधकाम सुरू असताना युवराज दाखले तिथे आले व आपण शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना संपर्क प्रमुख तिरोडा विधानसभा मतदार संघ या पदांवर असल्याचे सांगून तुमचे अनधिकृत बांधकाम प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाला पाडू देणार नाही, असे खोटे आश्‍वासन देऊन व आमिष दाखवून फिर्यादी व इतर तिघांकडून प्रत्येकी तीस हजार रुपये याप्रमाणे एक लाख 20 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली.

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न – दाखले
युवराज दाखले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आरोपांचे खंडन केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव संबंधित अधिकारी आणि संघटनेच्या पुढाऱ्यांकडून आखण्यात आला आहे.

आपण कोणत्याही नागरिकाकडे पैशांची मागणी केली नाही. उलट स्मिता देसाई यांचे पती संजय देसाई यांनी बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी सहकार्य करावे, म्हणून स्वतःहून आपल्याकडे काही पैसे देऊ केले होते. माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना कागदोपत्री मदत करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान नागरिकांनी स्वतःहून बांधकामे केली आणि प्राधिकरणाने कारवाई केली. याचा गैरफायदा घेत काही नेत्यांनी नागरिकांना खोटा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)