पर्थ : गोलंदाजांच्या अचूक मा-यानंतर सलामीवीर डेविड वाॅर्नर आणि एेरन फिंच यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिस-या टी-20 क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेटनी मात केली. यासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यानंतरचे सलग दोन टी-20 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली.
पाकिस्तानने दिलेले 107 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने 11.5 षटकांत पूर्ण केले. सलामीवीर एेरन फिंचने 36 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकांरासह नाबाद 52 आणि डेविड वाॅर्नरने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकांरासह नाबाद 48 धावांची खेळी करून पाकवर 10 विकेटनी दणदणीत विजय मिळविला.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले होते. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करून पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळविले. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू न शकल्याने त्यांच्या संघास 20 षटकांत 8 बाद 106 धावांपर्यतच मजल मारता आली. इफ्तिखार अहमदने 37 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय इमाम-उल-हकने 14, बाबर आझमने 6 व हारिस सोहैलने 8 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने 3 तर मिचेल स्टार्क आणि शाॅन एबाॅटने प्रत्येकी 2 गडी बाद केले. एश्टन एगरने 1 गडी बाद केला. शाॅन एबाॅटला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.