#AUSvPAK 2nd Test : वाॅर्नरचे नाबाद दीडशतक; आॅस्ट्रेलिया १ बाद ३०२

मार्नस लबुशेनचे सलग दुसरे शतक

अॅडलेड : डेव्हिड वाॅर्नरची दीडशतकी तर मार्नस लबुशेनच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पाकविरूध्दच्या दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी ७३ षटकांत १ बाद ३०२ अशी मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वाॅर्नर नाबाद १६६ तर लबुशेन नाबाद १२६ धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यांची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स केवळ ४ धावा करत माघारी परतला. त्याला शाहीन आफरीदिने मोहम्मद रिजवानकरवी झेलबाद केले. त्यानंतर वाॅर्नरने मार्नस लबुशेनच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी पाक गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला व दिवसअखेर २९४ धावांची दमदार भागिदारी केली.

डेविड वाॅर्नरने कसोटी कारकीर्दितील २३ वे शतक तर माॅर्नस लबूशेनने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. वाॅर्नरने १६६ धावांच्या खेळीत १९ चौकार तर लबूशेनने १२६ धावांच्या खेळीत १७ चौकार लगावले.

दरम्यान, आॅस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत पाकवर एक डाव आणि ५ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह आस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा विजय मिळवून पाकला व्हाॅईटवाॅश देण्याचा आॅस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे तर पाकिस्तान दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.