#AUSvPAK 1st Test : पाकिस्तान पराभवाच्या छायेत

ब्रिस्बेन : पहिल्या डावात पाकिस्तानचा २४० धावात खुर्दा उडविल्यानंतर आॅस्ट्रेलियाने मार्नस लबुशेन आणि डेविड वाॅर्नरच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर ५८० अशी टोलेजंग धावसंख्या उभारली आहे. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३४० धावांची आघाडी घेतल्यावर पाकची दुस-या डावात ३ बाद ६४ अशी अवस्था झाली असून डावाचा पराभव टाळण्यासाठी पाकला २७६ धावांची गरज आहे.

दुस-या डावातही पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. अजहर अली (०५), हारिस सोहैल (०८) आणि असद शफीफ (००) झटपट बाद झाले. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानच्या ३ बाद ६४ धावा झाल्या होत्या आणि खेळपट्टीवर बाबर आजम २० आणि शान मसूद २७ धावांवर खेळत होते. आॅस्ट्रेलियाकडून दुस-या डावात गोलंदाजीत मिचेल स्टार्कने २ तर पॅट कमिन्सने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, कालच्या १ बाद ३१२ वरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाने दुसरा गडी डेविड वाॅर्नरच्या रूपाने गमावला. वाॅर्नरला १५४ धावांवर नसीम शाहने बाद केले. त्यानंतर स्टीव स्मिथ ०४, मैथ्यू वेड ६०, ट्रैविस हेड २४, टिम पेन १३ ठराविक धावांच्या अंतरावर बाद झाले. त्यानंतर मार्नस लबूशेनलाही १८५ धावांवर असताना शाहीन अफरीदीने झेलबाद केले.

त्यानंतर मिचेल स्टार्क ०५, पॅट कमिन्स ०७ आणि जोश हेझलवूड ०५ धावांवर बाद झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव ५८० वर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून गोलंदाजीत यासिर शाहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. हारिस सोहैल आणि शाहीन अफरीदीने प्रत्येकी २ गडी बाद केले तर नसीम शाह आणि इमरान खानने प्रत्येकी १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.