मेलबर्न : आॅस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या कसोटीत न्यूझीलंडचा २४७ धावांनी पराभव केला. यासह आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शतकी खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड हा सामनावीर ठरला.
A fine century by Tom Blundell couldn't prevent our Australian men’s team from securing victory by 247 runs in the Boxing Day Test.
Congrats to our Aussies and thank you to the huge number of people who attended the @MCG throughout the Test. See you in Sydney! 🇦🇺️👏#AUSvNZL pic.twitter.com/8q6Sl6w0j6
— Cricket Australia (@CricketAus) December 29, 2019
आॅस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ५ बाद १६८ वर घोषित करून पहिल्या डावातील ३१९ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर ४८८ धावांच आव्हान ठेवलं होतं. दुस-या डावात आॅस्ट्रेलियाकडून वाॅर्नरने ३८, जो बर्न्सने ३५, हेडने २८ आणि वेडने नाबाद २८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत वॅग्नरने ३ तर सॅटनरने १ गडी बाद केला.
विजयासाठी ४८८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव २४० धावांवर आटोपल्याने त्यांना २४७ धावांनी पराभव स्विकारावा लागला. न्यूझीलंडकडून दुस-या डावात फलंदाजीत टाॅम ब्लंडेल याने एकट्याने संघर्ष करत २१० चेंडूत १५ चौकारासह १२१ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. आॅस्ट्रेलियाकडून दुस-या डावात गोलंदाजीत नाथन लायनने ४, जेम्स पॅटिन्सने ३ तर मार्नस लबूशेनने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडच्या ११४, स्मिथच्या ८५, टिम पेनच्या ७९ आणि लबूशेनच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर ४६७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आॅस्ट्रेलियानं पॅट कमिन्सच्या ५, जेम्स पॅटिन्सनच्या ३ आणि मिशेल स्टार्कच्या २ बळीच्या जोरावर न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या १४८ धावांवर गुंडाळत ३१९ धावांची भक्कम आघाडी घेतली होती.