#AUSvIND 4Th Test : ब्रिस्बेन कसोटीबाबत संभ्रम

सिडनीतच चौथा सामना होण्याची शक्‍यता

मेलबर्न – ब्रिस्बेन येथे होत असलेली चौथी कसोटी सिडनीत खेळवली जाण्याची शक्‍यता खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेच व्यक्त केली आहे. सिडनीतच तिसरी कसोटी झाल्यानंतर ही कसोटी खेळवली जाणार असल्याचे संकेत आहेत. ब्रिस्बेनला करोनाबाबतचे नियम जास्त कठोर असल्याने भारतीय संघाने तेथे जाण्यास नकार दिला असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे.

येत्या गुरुवारपासून तिसरी कसोटी सिडनीत सुरू होणार आहे. हा सामना पूर्ण होण्यापूर्वीच चौथ्या कसोटीबाबतची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्‍यता आहे. चौथ्या सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. करोना तसेच विलगीकरणाबाबतचे ब्रिस्बेनमधील नियम अतिशय कठोर आहेत. भारतीय संघ दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात बायोबबलच्या नियमाचे पालन करत आहे. तरीही जर संघ ब्रिस्बेनला दाखल झाला तर तिथे त्यांना सवलत मिळणार का, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसल्याने सध्या हा सामना नक्की कुठे होणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. 

अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाला दाखल झालेला भारतीय संघ 14 दिवस विलगीकरणात होता. त्यानंतर संघाला काही सवलत मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करता येईल. त्याव्यतिरिक्त कुठेही बाहेर जाण्यावर बंदी राहील. त्यामुळे भारतीय संघाने ब्रिस्बेनला जाण्याऐवजी सिडनीमध्येच राहायचे ठरवले आहे.

ब्रिस्बेनमध्ये विलगीकरणात राहण्याचीही तयारी आहे. मात्र, तेथील सामान्य नागरिकांप्रमाणेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तरच तेथे जाण्याचा विचार करू, असे बीसीसीआयने म्हटले आहे. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ आज (सोमवार) सिडनीला रवाना होणार आहे. गुरुवारपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

सरावावर पाणी 

मेलबर्नमध्ये भारतीय संघ कसून सराव करत आहे. रविवारी मात्र, अचानक आलेल्या पावसाने हे सराव सत्र वाया गेले. त्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंगरूममध्येच थांबावे लागले. सिडनीत येत्या गुरुवारपासून तिसरी कसोटी सुरू होत असल्याने संघाला रोज दोन सत्रात सरावाची गरज आहे. मात्र, आता रविवारचा दिवस वाया गेल्यामुळे सिडनीत दाखल झाल्यावरच आता सराव करावा लागणार आहे. संघ आज (सोमवार) सिडनीत दाखल होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.