मेलबर्न –हिटमॅन रोहित शर्मा फिट झाला असून त्याचा विलगीकरण कालावधीही संपल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांसाठी त्याचा संघातील समावेश निश्चित झाला आहे. भारतीय संघाच्या सराव सत्रात रोहितने सहभाग घेतला आणि पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. मात्र, तो फिट ठरल्यामुळे मयंक आग्रवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला डच्चू द्यावा लागणार असल्याने आता संघ निवड करताना पेच निर्माण झाला आहे.
रोहित नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबतही संभ्रम निर्माण होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेत मायदेशी परतल्यामुळे अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्याने पहिल्या कसोटीतील पराभव मागे टाकून मेलबर्न कसोटी जिंकली व मालिकेत बरोबरी केली. आता येत्या 7 जानेवारीपासून सिडनीत खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीचे महत्त्व वाढले आहे. अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडताना रोहित फिट ठरल्याने संघ निवडीसाठीही प्रश्न निर्माण झाले आहेत.
सिडनीतील 14 दिवसांच्या विलगीकरणानंतर रोहितने बुधवारी भारतीय संघाच्या सराव सत्रात भारतीय संघासह सहभाग घेतला. कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहित कसोटी सामन्यांतसुद्धा पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. मात्र, गेल्यावर्षी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी रोहितकडे प्रथमच सलामीवीराची भूमिका सोपवण्यात आली.
रोहितने या संधीचे सोने करताना एक द्विशतक आणि दोन शतके झळकावली. मेलबर्नवरील कसोटीत पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने दोन्ही डावांत अनुक्रमे 45 आणि नाबाद 35 धावा करून छाप पाडली. परंतु मयंक आग्रवाल व हनुमा विहारी यांना अपयश आल्याने रोहितचा समावेश करताना या दौघांपैकी एकाला संघातून डच्चू देण्यात येणार आहे.