#AUSvIND : भारतीय संघात होणार मोठे फेरबदल

नवी दिल्ली – पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर आता बॉक्‍सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत बीसीसीआयमधील सुत्राने दिले आहेत. मेलबर्नवर दुसरी कसोटी येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा अत्यंत मानहानीकारक पराभव झाल्याने संपूर्ण संघ, प्रशिक्षक तसेच निवड समिती यांच्यावर कडाडून टीका होत आहे. त्यामुळे भारतीय संघात आता मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मेलबर्नवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ नियमित कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज महंमद शमी यांच्या शिवाय उतरणार आहे. कोहलीच्या जागी लोकेश राहुलला तर शमीच्या जागी महंमद सिराजला संघात स्थान मिळणार असल्याचे खात्रीलायकपणे सांगितले जात आहे. सिराज दुसऱ्या सामन्यात कसोटीत पदार्पण करू शकतो. कोहलीच्या जागी संघाचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणे करणार असल्याने मधल्या फळीत आणखी एका फलंदाजाला खेळवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात अपयशी ठरलेला पृथ्वी शॉ याच्या जागी शुभमन गिल याला संघात स्थान दिले जाणार आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी ऋषभ पंतचा समावेश केला जाईल. त्याने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात दमदार शतक फटकावले होते.

असा असेल संघ – मयंक आग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, महंमद सिराज, जसप्रीत बुमराह.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.