सिडनी – भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना, कायमच आमचा ऑस्ट्रेलियाचा संघ बलवान मानला गेला आहे. हा संघ समतोल आणि भक्कम असून गेल्या वेळच्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाशी सध्याच्या संघाची तुलना केल्यास एक गोष्ट नक्की सांगता येईल की आताचा संघ अधिकच भक्कम आहे, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी म्हटले आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीकडे प्रचंड अनुभव आहे. मार्नस लबूशेन सध्या कमालीच्या फॉर्मात आहे. इतरही फलंदाज आपापली भूमिका चोख पार पाडत आहेत, पण वॉर्नर-स्मिथ जोडीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला विशेष बळ मिळेल, असा विश्वास बुकानन यांनी व्यक्त केला.
विराट कोहलीची टीम इंडियामधील अनुपस्थिती म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी वरदानच आहे. कोहली हा सामन्यावर वर्चस्व राखणारा खेळाडू आहे. गेल्या वेळी जेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका झाली, तेव्हा विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. कसोटी मालिकेचा हिरो चेतेश्वर पुजारा ठरला असला तरी कोहलीची मैदानावरील उपस्थिती खूप महत्त्वाची होती. सामन्यात आणि ड्रेसिंग रूममध्ये विराटची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल, असे बुकानन म्हणाले.
दरम्यान, बुकानन असेही म्हणाले की, एकोणच भारतीय संघाच्या मानसिकतेची कसोटी ही पहिल्या दिवस-रात्र सामन्यात लागणार आहे; कारण भारतीयांना गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव त्यामानाने कमीच आहे. शिवाय बॉक्सिंग डे कसोटीमध्ये प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा घरच्या संघालाच मिळेल, हे नक्की.