सिडनी –ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन अबॉट दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी मोझेस हेन्रीक्स याला पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे. भारत व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून ऍडलेडला पहिला कसोटी सामना रंगणार आहे. दिवस-रात्र पद्धतीने गुलाबी चेंडूवर हा सामना होत आहे.
पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे अबॉट पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हेन्रीक्सला स्थान देण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात हेन्रीक्सही दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो पूर्ण तंदुरुस्त ठरला असल्याने यजमान संघाची चिंता दूर झाली आहे.
हेन्रीक्सने जवळपास चार वर्षांनी संघात पुनरागमन करत आहे. यासह कॅमेरुन ग्रीन हा देखील दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरल्याने तो देखील पहिल्या कसोटीत खेळणार असल्याने यजमान संघाला दिलासा मिळाला आहे.