ऍडलेड – फलंदाजांच्या यशस्वी कामगिरीनंतर गोलंदाजांनीही केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ऍशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत 275 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी गेतली आहे. ब्रिस्बेनमधील पहिली कसोटीही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.
ऍडलेडमध्ये हा सामना प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळवला गेला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रकाशझोतातील कसोटीत 100 टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक फटकावणारा ऑस्ट्रेलियाचा मार्नस लेबुशेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविवारच्या 4 बाद 82 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपूष्टात आला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याने 42 धावांत 5 बळी घेतले.
मिशेल स्टार्क आणि नाथन लॉयनने प्रत्येकी 2 गडी बाद केले. मायकेल नेसरने 1 बळी घेतला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक फटकावता आले नाही. ख्रिस वोक्सने 44 तर, यष्टीरक्षक जोश बटलरने तब्बल 207 चेंडू खेळताना 26 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 473. इंग्लंड पहिला डाव – 236. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 9 बाद 230 घोषित. इंग्लंड दुसरा डाव – 113.1 षटकांत सर्वबाद 192 धावा. (ख्रिस व्होक्स 44, रोरी बर्न्स 34, डेव्हीड मलान 20, ज्यो रूट 24, जोश बटलर 26, झाय रिचर्डसन 5-42, मिशेल स्टार्क 2-43, नाथन लॉयन 2-55, मायकेल नेसर 1-28).