ऑस्ट्रेलियन टेनिस : जेनिफर ब्रॅडी, नोवाक जोकोविचच फेव्हरीट

मेलबर्न  – सेरेना विल्यम्सच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याची संधी आणखी एका अमेरिकन खेळाडूलाच चालून आली आहे.

द्वितीय मानांकित जेनिफर ब्रॅडी हिने उपांत्य लढतीत कॅरोलिना मुचोवा हिचा कडवा प्रतिकार 6-4, 3-6, 6-4 असा मोडून काढला व अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे संभाव्य विजेता मानला जात असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यानेही धडाक्‍यात अंतिम फेरी गाठत विजेतेपदाची आशा आणखी भक्कम केली आहे.

महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पहिला सेट जिंकून थाटात सुरुवात करणाऱ्या ब्रॅडीला दुसरा सेट गमवावा लागला. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये तिच्या हातून चार मॅच पॉइंटही गेले. पण, मुचोवाचा फोरहॅंड बाहेर गेल्यावर ब्रॅडी या निराशेतून बाहेर आली आणि तिने विजयाचा आनंद साकार करताना कोर्टवरच लोळण घेतली. ब्रॅडी प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळणार आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचने रशियाच्या अस्लन कारात्सेव याचे आव्हान सहज संपुष्टात आणत कारकिर्दीत 28 व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

जोकोविचला आता विक्रमी नवव्यांदा विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. उपांत्य फेरीत त्याने कारात्सेव याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने या सामन्यात 30 विजयी फटके व 17 बिनतोड सर्व्हिस केल्या.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील नवव्या विजेतेपदावर जोकोविचला 18 व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. त्याच्यापुढे केवळ रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे असून, त्यांनी प्रत्येकी 20 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.