मेलबर्न – अव्वल मानांकित ऍश्ले बार्टी हिने जवळपास एका वर्षाने ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुनरागमन करताना जबरदस्त विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत तिने पहिल्या फेरीच्या लढतीत डॅनिका कोविनच हिचा 6-0, 6-0 असा पराभव केला.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत तिला सोफिया केनिनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर बार्टीने फ्रेंच आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. करोनाच्या संकटकाळात ती ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या आठवड्यात तिने यारा व्हॅला क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. गेल्यावर्षी फेब्रुवारीनंतर ती एकही स्पर्धा खेळली नव्हती.
बार्टीच्या झंझावताचा कोविनिच सामना करू शकली नाही. तिच्याकडून तब्बल 28 टाळता येणाऱ्या चुका झाल्या. तुलनेच बार्टीने कमालीचा अचूक खेळ करताना मिळविलेल्या आठ ब्रेकपॉइंटपैकी सहा सत्कारणी लावले. तिने अवघ्या 44 मिनिटात विजय मिळविला.
शेरिफची ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीतून आलेल्या मायर शेरिफ हिने पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारी ईजिप्तची पहिली खेळाडू होण्याचा मान मिळविला. तिने पात्रता फेरीतूनच आलेल्या शोल पॅक्वे हिचा 7-5, 7-5 असा पराभव केला. गेल्या वर्षी ती फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत पोचली होती. मात्र, तिचे पदार्पण अपयशी ठरले होते.
अझारेन्काचा पराभव
व्हिक्टोरिया अझारेन्का हिला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या जेसिका पेगुला हिने तिचा 7-5, 6-4 असा पराभव केला.
पुरुषांच्या गटात पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास याने आपली आगेकूच सुरू करताना गाईल्स सिमोन याचा 6-1, 6-2, 6-1 असा पराभव केला. कारकिर्दीमधील 21 व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या स्पेनच्या राफेल नदाल याने पाठीच्या दुखण्यावर मात करताना सर्बियाच्या लास्लो जेरे याचे आव्हान 6-3, 6-4, 6-1 असे संपुष्टात आणले.
करोनामुळे प्रत्यक्ष टेनिसच्या सरावापासून दूर असलेला नदाल बारा दिवसापूर्वी एका प्रदर्शनीय लढतीसाठी डॉमिनिक थिमविरुद्ध कोर्टवर उतरला होता. एवढ्याच सरावावर त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पाऊल ठेवले. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरला लंडन येथे मोसमाच्या अखेरच्या स्पर्धेत खेळल्यानंतर नदाल प्रथमच स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी झाला आहे.
नवव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनी यान दोन वेळा ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचलेल्या केविन अँडरसनचा 7-6(11-9), 7-5, 6-3 असा पराभव केला. सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव याने दुसरी फेरी गाठताना जॉन केन अरेना याचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव केला. चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने वॅसेक पॉस्पिसिल याला 6-2, 6-2, 6-4 असे हरवत सलग 15 वा विजय प्राप्त केला. सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्ह याने यानिक हाफमान याचा 6-3, 6-3, 6-4 असा पाडाव केला.
गतउपविजेत्या गार्बिन मुगुरुझा हिने मार्गारिटा गास्पारयान हिला 6-4, 6-0 असे पराभूत केले.
बोपण्णा-मॅक्लेहान पराभूत
पुरुषांच्या दुहेरीच्या पहिल्या फेरीतच भारताचा रोहन बोपण्णा व बेन मॅक्लेहान या जोडीलापराभवाचा सामना करावा लागला. या फेरीत जी सुंग नाम व मिन क्यु सॉंग या जोडीने त्यांचा 6-4, 7-5 असा पराभव केला व दुसरी फेरी गाठली.