ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व

कोलकाता: इंडियन प्रीमिअर लीग 2020 चा लिलाव आज येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी यात सर्वात जास्त रक्कम पटकावुन आश्‍चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोलकता नाईट रायडर्सने 15.50 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावून आपल्या संघात घेतले.

स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या परदेशी खेळाडूवर लावण्यात आलेली ही विक्रमी बोली आहे. यापुर्वी भारताच्या युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर बंगळुरने 16 कोटी रुपयांना विकत घेतलं होते. क्रिकेटमधून ब्रेक घेतलेल्या ग्लेन मॅक्‍सवेललादेखील पंजाब संघाने 10.75 कोटी रुपयांची बोली लावुन आपल्या संघात घेतले आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजच्या खेळाडूंवर चांगली बोली लागली आहे. आयपीएलचे गेले दोन हंगाम अनपेक्षित बोली घेणाऱ्या जयदेव उनाडकटची यंदाच्या हंगामात मात्र घसरगुंडी उडाली आहे. त्याला 3 कोटी रुपयांची बोली लावली गेली. 2018 साली उनाडकटवर राजस्थानने 12 कोटी 50 लाखांची बोली लावली होती. या दोन्ही हंगामांमध्ये जयदेव सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थानने त्याला आगामी हंगामासाठी करारमुक्त करत, लिलावात कमी रक्कम देऊन पुन्हा संघात घेतले आहे.

नाथन कुल्टरनाईलला मुंबई इंडियन्सने 8 कोटी देऊन आपल्या संघात घेतले. कमिन्सने इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सला मागे टाकत सर्वाधीक रक्कम मिळविली. स्टोक्‍सला राईजींग पुणे सुपरजायंट्‌सने 14.50 कोटीला घेतले होते. पाणिपुरी विकणारा पण भक्कम द्विशतकवीर फलंदाज यशस्वी जायस्वालला राजस्थानने 2.40 कोटीला संघात घेतले.
19 वर्षांखालील संघाचा अव्वल खेळाडू प्रियम गर्गला हैदराबादने 1.90 कोटी देत करारबद्ध केले.

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज शेमरन हेटमायरला दिल्ली कॅपीटलने 7.75 कोटीत आपल्या संघात घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरीसला 10 कोटी देत बंगळुर संघाने घेतले, तर वेस्ट इंडिजच्या शेल्डन कोट्रेल पंजाबशी 8.50 कोटीत करारबद्ध झाला. भारतीय खेळाडूंमध्ये पियुष चावलाने चेन्नईशी 6.75 कोटीचा करार केला. सर्वात “तरुण’ खेळाडू प्रवीण तांबे या 48 वर्षीय “तरुण’ खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांची बोली लावून संघात घेतले. तांबेने आपल्या फिरकीवर अनेक दादा फलंदाजांना संभ्रमात टाकत वर्चस्व राखले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.