मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या अमिरातीत होत असलेल्या उर्वरित 31 सामन्यांत सहभागी होण्यास ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी होकार दिला असून, त्यांच्या क्रिकेट मंडळाने ही माहिती दिली आहे.
भारतात सुरू झालेल्या यंदाच्या स्पर्धेत काही संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर करोनामुळेच भारतातच जर ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली असती, तर परदेशी खेळाडूंनी त्यातून माघार घेतली असती. आता स्पर्धेचे उर्वरित सामने अमिरातीत खेळवले जाणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 31 सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी 21 दिवसांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार आहे.
बीसीसीआयने आयपीएलमधील संघ मालकांना परदेशी खेळाडू येतील, अशी ग्वाही दिली होती. आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौरा आहे. मात्र, काही खेळाडूंनी या दौऱ्यातून वैयक्तिक कारण देत माघार घेतली आहे. डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोनिस आणि डॅनियल सॅम्सने वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली आहे. वॉर्नर आणि कमिन्स यांनीही माघार घेतली असून, टी-20 विश्वकरंडक होणार असल्याने या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळत चांगला सराव करण्याची संधीही मिळणार आहे.
बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत संवाद साधत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी देण्याची विनंती बीसीसीआयने केली आहे. दुसरीकडे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी नसेल, असे सांगितले असल्यामुळे त्यांच्या खेळाडूंबाबत 15 जुलैला निर्णय होण्याची शक्यता आहे.