मेलबर्न :- बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेपूर्वी आजपासून(गुरूवार, 7 नोव्हेंबर) मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या भारत अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यामध्ये अनुभवी फलंदाज लोकेश राहुलवर दबाव टाकण्यासाठी सज्ज असल्याचे ऑस्ट्रेलिया अ संघाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड याने सांगितले.
न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर लगेचच लोकेश राहुल व ध्रुव जुरेल हे दोघे तातडीने ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते. दोघांची निवड आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक या पाच कसोटीच्या मालिकेसाठी झाली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत अ संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया अ संघाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड म्हणाला की, मी काही वर्षांपूर्वी भारतातील एका लढतीमध्ये राहुलला गोलंदाजी केली होती. मात्र घराच्या मैदानावर त्याला गोलंदाजी करण्याचा अनुभव निश्चित वेगळा असणार आहे. लोकेश राहुल २०१५ साली प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला गेला होता. यावेळी त्याने दमदार शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये चार लढती खेळताना केवळ २०.७७ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे.
लोकेश राहुल हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाज आहे. मात्र, मैदानात उतरल्यानंतर मात्र चांगल्या फलंदाजांना स्थिरावण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळीच अशा दर्जेदार फलंदाजाना दबावात आणता येऊ शकते, असे स्कॉट बोलंडने सांगितले.
तरच राहुलला संधी…
न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरू येथील पहिल्या कसोटीत राहुलने केवळ १२ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यानंतरच्या लढतीतून त्याला वगळण्यात आले होते. लोकेश राहूलने २०२३ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर तो सातत्याने धावांसाठी झगडताना दिसून येत आहे. त्यानंतर त्याने इंग्लंड, बांगलादेश व न्यूझीलंड अशा तीन संघाविरुद्ध केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसल्यास राहुलला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये चेंडूला अधिक उसळी आणि स्विंग मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी चांगली कामगिरी करून आपली उपलब्धता सिद्ध करण्याचे राहुल समोर आव्हान असणार आहे.
राहुलची कसोटीतील कामगिरी
लढती : ५३,डाव : ९१,धावा : २९८१,शतके : ८,अर्धशतके : १५,सरासरी : ३३.८७