सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक तर, अफलातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत भारताच्या रवींद्र जडेजाने तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर संपूष्टात आला तर, भारताने दिवसातील उर्वरित खेळात आपल्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गील याच्या अरधशतकी खेळीच्या जोरावर 2 गडी गमावून 96धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 242 धावांनी पिछाडीवर आहे. खेळपट्टीवर कर्णधार अजिंक्य रहाणेसह चेतेश्वर पुजारा असून या जोडीवरच आता भारताची मदार आहे.
गुरूवारच्या2 बाद 166 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यानंतर मार्नस लेबूशेनव स्टिव्ह स्मिथ यांनी संघाला सुस्थिती प्राप्त करुन दिली. लेबूशेनने शतकाकडे कूच केली होती. मात्र, जडेजाने त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेकरवी बाद केले. हा झेल रहाणेने सर्वोत्तम रिफ्लेक्शन दाखवत घेतला. लेबूशेन 91 धावांवर बाद झाला. दरम्यान स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले.
मॅथ्यू वेडने स्मिथसह धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्नकेला मात्र, त्यालाही जडेजानेच तंबूचा रस्ता दाखवला. दिवसातील पहिले सत्र संपण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने कॅमेरून ग्रीनला शून्यावर माघारी पाठवले. दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर बुमराहनेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनीचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ जडेजाने पॅट कमिन्सला बाद केले. पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने मिशेल स्टार्कला 24 धावांवर बाद केले. तर जडेजाने नाथन लॉयनला शून्यावर बाद केले.
त्याचवेळी स्मिथने कसोटीतील 27 वे शतक पूर्ण केले व संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. त्यानंतर स्मिथने गिअर बदलला व आक्रमण सुरू केले. नेमके त्याचवेळी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या अचूक चेंडूफेकीवर तो धावबाद झाला. स्मिथने 226 चेंडूत 16 चौकारांसह 131 धावा केल्या. भारताकडून जडेजाने 4 गडी बाद केले. बुमराह व सैनीने प्रत्येकी 2 तर, महंमद सिराजे 1 गडी बाद केला.
भारताच्या डावाची सुरूवात थाटात करताना हिटमॅन रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी 70 धावांची सलामी दिली. ही जोडी यजमानांची डोकेदुखी ठरेल असे वाटत असतानाच जोश हेजलवुडने रोहितला 26 धावांवर बाद केले.
त्यानंतर गिलने कसोटी कारकिर्दितील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्यावेळी भारताची अवस्था 2 बाद 85 अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजार यांनी दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना संघाचे आणकी नुकसान होऊ दिले नाही. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 2 बाद 96 धावा केल्या होत्या. पुजारा 9 तर, रहाणे 5 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूड व कमिन्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 104.4 षटकांत सर्वबाद 338 धावा. (स्टिव्ह स्मिथ 131, मार्नस लेबूशेन 91, विल्यम्स पुकोव्हस्की 62, मिशेल स्टार्क 24, रवींद्र जडेजा 4-62, नवदीप सैनी 2-65, जसप्रीत बुमराह 2-66, महंमद सिराज 1-67). भारत पहिला डाव – 45 षटकांत 2 बाद 96 धावा. (शुभमन गील 50, रोहित शर्मा 26, चेतेश्वर पूजारा खेळत आहे 9, अजिंक्य रहाणे खेळत आहे 5, पॅट कमिन्स 1-19, जोश हेजलवूड 1-23).