सिडनी: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक संबंधांबाबत सतत धक्का बसत आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध संपवण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा उपयोग गरीब महिला आणि मुलींसाठी व सार्वजनिक कल्याणकारी योजनांसाठी केला जात होता. ऑस्ट्रेलियन विदेश विभाग आणि वाणिज्य विभागानेही याची पुष्टी केली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून 1.9 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत रोखली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार व व्यापार मंत्रालयाने या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे आणि असे म्हटले आहे की पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रक्कम आता बंद केली जात आहे. तो निधी प्रशांत महासागराच्या नवीन वचनबद्धतेसाठी वापरला जाईल.
‘सहायता कार्यक्रम प्रदर्शन अहवाल 2018-19’ नावाचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये मदत निधी रोखून ठेवण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. पाकिस्तान द्विपक्षीय सहाय्य कार्यक्रम 2019-20 मध्ये निधी कमी करून 1.9 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स करण्यात येईल. त्यानंतर 2020-21 दरम्यान तो पूर्णपणे रद्द केला जाईल. ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण दिले आहे, की मदत निधी रोखल्यामुळे प्रादेशिक सहकार्य आणि पाकिस्तानबरोबर शिष्यवृत्ती कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही.
या अहवालात पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था आणि देशातील सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त केली गेली आहे. अहवालानुसार, ‘पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती स्फोटक अवस्थेत पोहोचली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात काश्मीरमध्ये सैनिकी तणाव निर्माण झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
अहवालात म्हटले आहे की पंजाब आणि सिंध भागात दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत, परंतु खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही क्षेत्रात ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आलेल्या मदतीची रक्कम विविध कल्याणकारी कामांसाठी वापरली जाते.