#CWC19 : किवीचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी कायम

लंडन – मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 86 धावांनी पराभव करत आपलं गुणतालिकेतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. विजयासाठी 244 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 43.4 षटकांत सर्वबाद 157 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसमोरचं आव्हान आणखी कठीण झालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा हा निर्णय फसला, कारण लॉकी फर्ग्युसन, जिमी निशम आणि ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करत अवघ्या 92 धावांत कांगारुंचा निम्मा संघ माघारी धाडला. मात्र या परिस्थितीचा फायदा घेण्यात न्यूझीलंडचा संघ कमी पडला. ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 92 झाली असताना उस्मान ख्वाजा याने 88 आणि एलेक्स कैरी याने 71 धावा करत ऑस्ट्रेलिया संघास सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

विजयासाठी 244 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर हेन्री निकोलास 8 आणि मार्टीन गप्टील हा 20 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दोघांमध्ये 55 धावांची अर्धशतकी भागीदारीही करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण स्टार्कने विल्यमसनला त्यानंतर टॉम लाथम, मिचेल सैंटनर, ईश सोढ़ी आणि लॉकी फर्ग्यूसन यांना बाद करत संघाच्या विजयात मोठी कामगिरी बजावली. या पराभवामुळं आता अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडला पराभव करण्याशिवाय पर्याय नाही, तसेच यामुळं न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील वाटही कठिण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.