कॅनबेरा, (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटीश राजघराण्याची छाप चलनी नोटांवरून आता गायब केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील चलनी नोटांवर आतापर्यंत असलेली ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे चित्र आता हटवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेंट्रल बॅंकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
आता 5 डॉलरच्या नव्या नोटेवर ब्रिटनचे महाराजा चार्ल्स यांच्या चित्राऐवजी ऑस्ट्रेलियाची ओळख असलेल्या चित्राला जागा देण्यात येणार आहे. मात्र नाण्यांवर राजे चार्ल्स यांची मुद्रा यापुढेही कायम असण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियातील 5 डॉलरच्याच नोटेवर राजघराण्याची मुद्रा असत होती. त्याशिवाय अन्य नोटांवरील राजघराण्याची ओळख यापूर्वीच पुसून टाकण्यात आली आहे. आता 5 डॉलरच्या नोटावरील राजघराण्याची छबी देखील हटवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियातील सरकारबरोबर चर्चा करूनच घेण्यात आला आहे, असे सेंट्रल बॅंकेने म्हटले आहे.
मात्र हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ऑस्ट्रेलियातील विरोधकांनी म्हटले आहे. तर एक विरोधी नेते पीटर डटन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियासह इतर अनेक ठिकाणी ब्रिटीशांची वसाहत होती. तेंव्हापासून नोटांवर राजघराण्याची छाप असायची. मात्र आता ही छाप पुसून टाकायची मागणी होते आहे. तरी ऑस्ट्रेलियात ब्रिटीश राजघराणेच राज्याचे प्रमुख मानले जातात. मात्र हल्ली हे पद केवळ नाममात्र राहिले आहे.