#ICCWorldCup2019 : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सहज विजय

साऊथहॅम्पटन – गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर विश्‍वचसकापुर्वीच्या आपल्या अखेरच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 239 धावांची मजल मारत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 44.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 241 धावा करत पूर्ण केले.

यावेळी 241 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, वेगाने फलंदाजी करण्याच्या नादात कर्णधार फिंच 16 धावा करुन परतला. यानंतर ख्वाजाने शॉन मार्शच्या साथीत संघाचा डाव सावरला. यावेळी हे दोघे संघाला शतकी मजल मारुन देतील असे वाटत असताना मार्श 34 धावा करून परतल्याने ऑस्ट्रेलियाला 96 धावांवर दुसरा धक्‍का बसला.

यावेळी दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मार्श बाद झाल्यानंतर आलेल्या मॅक्‍सवेलच्या साथीत ख्वाजाने ऑस्ट्रेलियाची वाटचाल कायम राखली. मात्र, मॅक्‍सवेलही 36 धावा करुन बाद झाल्यानंतर आलेल्या स्टोइनिसने फटकेबाजी करायला सुरूवात केल्याने ऑस्ट्रेलियाची धावगती वाढली. हे दोघे फलंदाज ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच स्टोइनिस 32 तर ख्वाजा 89 धावा करुन परतले. हे दोघेही बाद झाल्यानंतर आलेल्या ऍलेक्‍स केरी आणि पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाचा सलामीवीर करुणारत्ने 16 तर कुशल परेरा 12 धावा करून परतल्याने श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मात्र, दुसऱ्या बाजूने सावध खेळी करत थिरिमानेने श्रीलंकेचा डाव सावरला. मात्र, थिरिमाने 56 धावांवर बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने श्रीलंकेच्या ठरावीक अंतराने विकेट जात राहिल्या त्यावेळी धनंजय डी सिल्वा, थिसारा परेरा आणि जीवन मेंडीस यांनी छोटेखानी खेळी करत श्रीलंकेला 239 धावांची मजल मारून दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here