दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

तिघे जण धावबाद झाल्याने भारत अडचणीत

सिडनी, दि. 9 – ओस्ट्रेलियाविरुद्ध येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे तीन फलंदाज धावबाद झाल्याने भारत अडचणीत आला. एक वेळ अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारी आत्मविश्‍वासाने खेळत असताना, एकामागून एक फलंदाज तंबूत परतल्याने भारताचा डाव 100.4 षटकांत 244 धावांवर संपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. आपल्या दुसऱ्या डावात दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 103 धावा केल्याने ही आघाडी आता 197 धावांची झाली असून यजमानांचे अद्याप 8 गडी खेळायचे आहेत.

या मालिकेतील पहिली कसोटी भारताने आठ विकेट्‌सने गमावली होती ती भारताच्या मानहानीकारक सर्वबाद 36 धावांमुळे. त्यानंतर भारताने दुसरी कसोटी 8 विकेट्‌सने जिंकून मालिकेमधली चुरस आणि थरार कायम राखला; शिवाय 1-1 अशी बरोबरीही साधली. आता तिसरी कसोटी जिंकून आपले मनोधैर्य मालिकेत कायम ठेवत मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. हाच संघर्ष पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या कसोटीत दिसून येत आहे.

कालच्या 2 बाद 96 या धावसंख्येवरुन भारताने आपला डाव आज सुरु केला तेव्हा, भारत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या (338) सहज गाठेल असे चित्र होते. मात्र, संघाच्या धावसंख्येत 21 धावांची भर पडल्यानंतर खुद्द कर्णधार अजिंक्‍य रहाणे तंबूत परतला. पॅट कमिन्सचा एक खाली राहिलेला चेंडू रहाणेच्या बॅटला लागून यष्टयांवर आदळला. रहाणेने 22 धावा केल्या. मग हनुमा विहारी अवघ्या 4 धावांवर धावबाद झाला. त्याला जोश हेझलवुडने धावबाद केले. दरम्यान, चेतेश्‍वर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामध्ये त्याने 5 चौकार लगावले. पुजाराने 50 धावांवरच यष्टीरक्षक टीम पेनकडे कमिन्सच्या गोलंदाजीवर झेल दिला.

मग रविंद्र जाडेजा (नाबाद 28) आणि ऋषभ पंत (36) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऋषभ पंतचा झेल डेव्हिड वॉर्नरने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर घेतला आणि पंतही तंबूत परतला. त्यानंतर भारताच्या डावाला गळतीच लागली. प्रथम व्यक्तिगत 10 धावांवर रविचंद्रन आश्‍विन धावबाद झाला. तर नंतर जसप्रित बुमराहसुद्धा शून्य धावांवर धावबाद झाला. पदार्पण करत असलेल्या नवदीप सैनीला 3 धावांवर मिशेल स्टार्कने मॅथ्यु वेडकरवी झेलबाद करवले. शेवटी मोहम्मद सिराजचा झेल टीम पेनने कमिन्सच्या गोलंदाजीवर घेतला आणि भारताचा डाव 244 धावांत संपला. या दरम्यान भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा जखमी झाले.

पहिल्या डावात 94 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दिवस अखेर 2 बाद 103 धावा करुन ही आघाडी 197 धावांपर्यंत वाढवली. पदार्पण करत असलेला विल पुकोव्हस्की मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बदली यष्टीरक्षक वृद्धीमान सहाकडे झेल देत तंबूत परतला. यावेळी संघाच्या धावा होत्या 16 तर पुकोव्हस्कीने धावा केल्या 10. त्यानंतर संघाच्या 35 धावा असताना भरवशाच्या डेव्हिड वॉर्नरला रविचंद्रन आश्‍वीनने पायचित पकडले. वॉर्नरने 13 धावा केल्या. आता भारत वेगाने विकेट्‌स मिळवत दबाव टाकणार, असे चित्र निर्माण झालेले असताना मार्नस लेबुशेन (नाबाद 47) आणि स्टीव्हन स्मिथ (नाबाद 29) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.

धावफलक –
ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – सर्वबाद 338 (स्टीव्हन स्मिथ 131, मार्नस लाबुशेन 91, विल पुकोव्हस्की 62; रविंद्र जाडेजा 4/62) – दुसरा डाव – 2 बाद 103 (मार्नस लेबुशेन ना. 47, स्टीव्हन स्मिथ ना. 29), मोहम्मद सिराज 1/20
भारत – पहिला डाव – सर्वबाद 244 – (शुभमन गिल 50, चेतेश्‍वर पुजारा 50, ऋषभ पंत 36; पॅट कमिन्स 4/29)
ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.