मॅंचेस्टर –अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला व तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
करोनामुळे मार्चपासून बंद असलेले क्रिकेट सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाले. त्यात इंग्लंडने वेस्ट इंडिज, आयर्लंड व पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या मालिका जिंकल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. या मालिकेत पहिल्या सामन्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सामनावीर तसेच मालिकावीरही ठरला.
जॉनी बेअरस्टोने दमदार शतकी खेळी केली. त्याला सॅम बिलिंग्ज व ख्रिस वोक्स यांनी अर्धशतके फटकावत सुरेख साथ दिली. बेअरस्टोने 126 चेंडूत 12 चौकार व 2 षटकार फटकावताना 112 धावांची खेळी केली. बिलिंग्जने 57 तर, वोक्सने नाबाद 53 धावांची खेळी केल्याने इंग्लंडला त्रिशतकी पल्ला गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क व ऍडम झम्पाने प्रत्येकी 3 गडी बाद केले.
303 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचीही घसरगुंडी उडाली होती. मात्र, अलेक्स केरी व ग्लेन मॅक्सवेल यांनी तडाखेबंद शतके फटकावली.
मॅक्सवेल जास्त आक्रमक होता. त्याने 90 चेंडूत तब्बल 7 षटकार व 4 चौकार फटकावत 108 धावांची खेळी केली. त्याला योग्य साथ देताना केरीने 114 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. अखेरच्या षटकांतील 2 चेंडू बाकी ठेवून ऑस्ट्रेलियाने विजयासह तिन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स व टॉम कुरेन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.