#Ashes2019 First Test : हा विजय अनपेक्षित नव्हता – पेन

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरुद्ध जरी आम्ही पहिल्या डावात खराब फलंदाजी केली होती, तरी दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करीत कसोटीत विजय मिळवू अशी मला खात्री होती. त्यामुळेच मला हा विजय अनपेक्षित नव्हता, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने सांगितले.

आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत इंग्लंडला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे आमचे काम सोपे झाले. आमच्या विजयात स्टीव्ह स्मिथचा सिंहाचा वाटा आहे. त्याने दोन्ही डावात शैलीदार शतके टोलवित आम्हाला विजयाची संधी निर्माण करून दिली असे सांगून पेन म्हणाला की, मॅथ्यू वेडने दुसऱ्या डावात शानदार खेळ केला. त्याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या दोन्ही फलंदाजांनी कसोटीत कशी संयमी खेळी केली पाहिजे याचा परिपाठ घालून दिला आहे. फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने खेळपट्टी अनुकूल नसूनही अत्यंत प्रभावी मारा केला. त्याला पॅट कमिन्सचीही योग्य साथ मिळाली. त्यांच्या या कामगिरीमुळे आम्ही एकतर्फी विजय मिळवू शकलो.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सांगितले की, आमच्या खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला. पहिल्या डावात महत्त्वाची आघाडी मिळाली होती तरी आम्हाला त्याचा लाभ घेता आला नाही. दुसऱ्या डावात आम्ही बेजबाबदारपणे विकेट्‌स फेकल्या. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या लायन व कमिन्स यांनी सुरेख गोलंदाजी केली. त्याचप्रमाणे स्मिथ याला विसरून चालणार नाही. दोन्ही डावांत त्याला बाद कसे करायचे हा आम्हाला सतत प्रश्‍न पडला होता. त्याची फलंदाजी नेहमीच प्रेक्षणीय असते.

सामन्याचा मानकरी स्मिथ म्हणाला की, हा माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सामना आहे. इंग्लंडमध्ये त्यांच्याविरुद्ध दोन्ही डावांमध्ये शतक करणे याच्यासारखे दुसरे भाग्यच असू शकत नाही. ऍशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यात आम्हाला विजय मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. अशीच कामगिरी या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये करण्याचा माझा मानस आहे. चेंडू कुरतडण्याच्याचा कलंक इतिहासजमा झाला आहे. जीवनातील हा डाग आपल्या बॅटीच्या कामगिरीद्वारेच पुसण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.