मेलबर्न – जाॅर्जिया वारहम आणि मेगन शूट यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात न्यूझीलंडचा 4 धावांनी पराभव करत विजय नोंदविला. यासह आॅस्ट्रेलियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जाॅर्जिया वारहम ही सामन्याची मानकरी ठरली. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा आॅस्ट्रेलिया चौथा संघ ठरला आहे.
WE’RE SEMI-FINAL BOUND!!!
Scorecard: https://t.co/vmrRWPJ87Y #CmonAussie pic.twitter.com/HuZId1b9Qh
— Australian Women’s Cricket Team ? (@AusWomenCricket) March 2, 2020
विजयासाठी 156 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघास 20 षटकांत 7 बाद 151 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि त्यांना 4 धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवासह त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडकडून फलंदाजीत सोफी डिवेइन हिने 31(36),मैडी ग्रीनने 28(23) आणि केटी मार्टिन हिने नाबाद 37(18) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जाॅर्जिया वारहम आणि मेगन शूट यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर, जेस जोनासेन हिने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बेथ मूनीच्या 60(50),एश्ले गार्डनरच्या 20(20), एलिस पेरी 21(15), मेग लैनिंगच्या 21(17) आणि रेचल हेंसच्या नाबाद 19(08) धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 155 अशी मजल मारली होती. न्यूझीलंडकडून अन्ना पीटरसन हिने 2, लेह कैस्परेक, हेली जेनसन आणि एमेली केर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.