बुमराह-आश्‍विनपुढे कांगारूंची अडचण

बॉक्‍सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलिया सर्वबाद 195; भारत 1 बाद 36

मेलबन – ऍडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे पानिपत करणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियाला भारतीय खेळाडूंच्या बदललेल्या, अर्थात सकारात्मक मानसिकतेचा प्रत्यय आला. आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात येथे शनिवारी सुरु झालेल्या प्रतिष्ठेच्या “बॉक्‍सिंग डे’ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवले. दिवसभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या सर्वबाद 195 धावा झाल्या असून त्यानंतर भारताने सावध खेळ करत 1 बाद 36 अशी मजल मारली आहे. जसप्रित बुमराह आणि आर. आश्‍विनच्या माऱ्यापुढे एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला टिच्चून खेळता आले नाही.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विराट कोहली भारतात परतल्यानंतर भारताची धुरा वाहणाऱ्या अजिंक्‍य रहाणेने गोलंदाजीत कल्पक आणि आश्‍चर्यकारक बदल करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. सर्वप्रथम जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीवर सलामीवीर ज्यो बर्न्स यस्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन परतला. बर्न्सला खातेही उघडता आले नाही.

मग रहाणेने अचानकपणे रविचंद्रन आश्‍विनकडे चेंडू दिला आणि कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवत आश्‍विनने मॅथ्यु वेडला रविंद्र जाडेजाकरवी झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली. वेडने 30 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सर्वात भरवशाच्या आणि आक्रमक अशा स्टीव्हन स्मिथने आश्‍विनचा चेंडू ग्लान्स केला आणि चेतेश्‍वर पुजाराने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक लो कॅच पकडला. स्मिथलाही खातेसुद्धा उघडता आले नाही.

मग मार्नस लेबुशेन आणि ट्रॅविह्स हेडने जास्त पडझड होऊ दिली नाही. पण पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजने मार्नस लेबुशेनला चकवले. सिराजचा ग्लान्स केलेला चेंडू शुभमन गिलने उजवीकडे झेपावत टिपला. लेबुशेनने 4 चौकारांसह 48 धावा केल्या. त्याने ट्रॅव्हिस हेडसमवेत 86 धावांची भागिदारीही केली. लाबुशेन परतल्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर रहाणेने हेडला गलीमध्ये झेलले. हेडने 38 धावा केल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद सिराजने कॅमेरून ग्रीनला 12 धावांवर पायचित पकडले. तर कर्णधार टीम पेनचा झेल हनुमा विहारीने आश्‍विनच्या गोलंदाजीवर घेतला. पेनने 13 धावा केल्या.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना टिच्चून फलंदाजी करताच आली नाही. मिशेल स्टार्कचा झेल बुमराहच्या गोलंदाजीवर सिराजने घेतला. स्टार्कने 7 धावा केल्या. मग धीराने खेळत असलेल्या नॅथन लियॉनला बुमराहनेच पायचित पकडले. त्याने 20 धावा केल्या. मग पॅट कमिन्सचा उम्च उडालेला झेल पुन्हा एकदा मोहमद सिराजने घेत रविंद्र जाडेजाच्या खात्यात आणखी एक विकेट जमा केली. कमिन्सने 9 धावा केल्या.

भारताकडून “यॉर्कर मास्टर’ जसप्रित बुमराहने 16 षटकांत 3.50 च्या सरासरीने 56 धावा देत चार खंदे मोहरे टिपले. तर “फिरकी मास्टर’ रविचंद्रन आश्‍विनने 24 षटकांत 35 धावा देत 3 विकेट्‌स घेतल्या. पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने मार्नस लेबुशेन आणि कॅमेरून ग्रीन यांच्या महत्त्वाच्या विकेट्‌स घेताना 15 षटकांत 40 धावा दिल्या. तर जाडेजाने एक विकेट घेतली. म्हणजेच 72.3 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या सर्वबाद 195 धावा झाल्या.

भारताने आपल्या पहिल्या डावात दिवस अखेर 1 बाद 36 धावा केल्या. सलामीवीर मयंक आगरवाल हा मिशेल स्टार्कच्या पहिल्या षटाकाच्या अखेरच्या चेंडूवर शून्यावर पायचित झाला. त्यानंतर शुभमन गिल (5 चौकारांसह) नाबाद 28 तर चेतेश्‍वर पुजाराने नाबाद 7 धावा करत आणखी पडझड होऊ दिली नाही.

त्यापूर्वी, भारताने आजच्या सामन्यासाठी एकूण चार बदल केले. मातृत्त्वाच्या रजेवर गेलेल्या विराट कोहलीच्या जागी रविंद्र जाडेजा आणि यष्टीरक्षक वृद्धीमान सहाच्या जागी ऋषभ पंत यांना संघात घेतले. तर पृथ्वी शॉ आणि जखमी मोहम्मद शामीच्या जागी शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना पदार्पणाची संधी देण्यात आली. अजिंक्‍य रहाणेकडे नेतृत्त्वाची जबाबदारी आली.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – 72.3 षटकांत सर्वबाद 195 – मार्नस लाबुशेन 48 (4 चौकार), ट्रॅव्हिस हेड 38 (4 चौकार), मॅथ्यु वेड 30 (3 चौकार); जसप्रित बुमराह 4-56, आर. आश्‍विन 35-3
भारत – पहिला डाव – 1 बाद 36 – शुभमन गिल नाबाद 28 (5 चौकार)
ऑस्ट्रेलियाकडे 159 धावांची आघाडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.