900 गुंतवणूकदारांची 40 कोटीची फसवणूक झाल्याची शक्यता
पुणे – शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि फोर व्हिलर देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संतोष सावंत आणि शुभ ट्रेड बीज कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर व्यवसायिकाच्या दाजीस पिस्तुल दाखवत धमकावत पोलीस कर्मचारी सावंत यांनी पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. बेकायदा मध्यस्थी करताना आणखी एक पोलीस कर्मचारी सापडल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. बीज इंडिया कंपनीत 900 जणांनी जवळपास 40 कोटीची गुंतवणूक केल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.
याप्रकरणी निखिल लक्ष्मण मिरगे (वय 29, रा. नांदेडसिटी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिजित धोंडिबा सावंत, शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनीचे संचालक व पोलीस कर्मचारी संतोष सावंत यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक दरांचे हित संबधाचे सरंक्षण अधिनियम यासह इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. तर व्यवस्थापकीय संचालक अभिजित सावंतचा पोलीस कर्मचारी संतोष सावंत हा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.