AUS vs PAK 1st ODI Highlights : पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 2 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना खूपच रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुणा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर असहाय्य दिसत होता आणि 46.4 षटकात 203 धावांवरच गारद झाला.
ऑस्ट्रेलियाला 204 धावांचे माफक लक्ष्य मिळाले होते. मात्र घरच्या भूमीवरही हे छोटे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मोठा घाम गाळावा लागला. संघाने 8 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर पॅट कमिन्सने अप्रतिम कामगिरी करत 32 धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा हा पहिला वनडे पराभव आहे.
The pacers give it their all in a hard-fought contest at the MCG!
Australia win the first ODI by two wickets 🏏#AUSvPAK pic.twitter.com/33tlPGH7Ap
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2024
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला तिसऱ्याच षटकात सॅम अयुबच्या रूपाने पहिला धक्का बसला. केवळ 1 धावा काढून अयुब मिचेल स्टार्कच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. दुसरा सलामीचा फलंदाज शफीकही जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. त्याने 26 चेंडूत 12 धावा केल्या आणि स्टार्कने त्याला पॅव्हेलियनचा रस्ताही दाखवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या माजी कर्णधार बाबर आझमने कर्णधार मोहम्मद रिझवानसोबत मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही अपयशी ठरला. बाबर 37 धावा करून बाद झाला. रिझवानने कर्णधारपदाची खेळी खेळताना 71 चेंडूत 44 धावा केल्या.
पाकिस्तानने 101 धावांवर आपले पाच फलंदाज गमावले होते. संघ अडचणीत आला होता अशावेळी वेगवान गोलंदाज नसीम शाहने 39 चेंडूत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. शाहीन आफ्रिदीनेही 22 धावा केल्या. त्यामुळे कसाबसा पाकिस्तानचा संघ 46.3 षटकात 203 धावांपर्यंत मजल मारू शकला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने आपले 8 गोलंदाज वापरले. त्यापैकी स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. कमिन्स आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी दोन यश मिळाले. तथापि, जम्पाने 10 षटकात 6.40 च्या इकॉनॉमीनं 64 धावा दिल्या. लॅबुशेन आणि ॲबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पॅट कमिन्सची शानदार फलंदाजी….
प्रत्युत्तरात 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी 28 धावांच्या स्कोअरवरच आपल्या विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिश यांनी धुरा संभाळली, ज्यांच्यामध्ये 85 धावांच्या भागीदारीमुळे सामना यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. पण स्टीव्ह स्मिथ 44 धावा करून बाद होताच ऑस्ट्रेलियाने 26 धावांच्या(113 ते 139 धावा) आत पुढील 4 विकेट गमावल्या.
या सामन्यात पाकिस्तानने दमदार पुनरागमन केले होते, मात्र कर्णधार पॅट कमिन्स त्यांच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरला. 185 धावांवर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावल्या असतानाकमिन्सने एका टोकाकडून शानदार फलंदाजी केली आणि तो शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. कमिन्सने 32 धावांची नाबाद कर्णधार खेळी खेळून संघाचा 2 गडी राखून विजय निश्चित केला. त्याच्याशिवाय जोश इंग्लिशने 49 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने 3 फलंदाज बाद केले. शाहीन आफ्रिदीला दोन यश मिळाले. नसीम शाह आणि मोहम्मद हसनन यांना प्रत्येकी एका विकेटवर समाधान मानावे लागले. पुढील सामना 8 नोव्हेंबरला ॲडलेडमध्ये होणार आहे.