नवी दिल्ली – लोकेश राहुल व ध्रुव जुरेल यांचा ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यापूर्वी भारत अ संघात समावेश केला जाऊ शकतो. दुसरा सामना ७ नोव्हेंबर पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविला जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू रविवारी रात्री उशीरा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले असल्याचा दावा आयएएनएसच्या वतीने करण्यात आला आहे.
मंगळवारी हे दोन्ही खेळाडू भारत अ संघात सामील होऊन दुसऱ्या लढतीत सहभागी होतील. जेणेकरून महत्वाच्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेपूर्वी ते भारतीय संघात सामील होतील. २२ नोव्हेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. राहुलने मायदेशात बांगलादेश व न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत सहभागी झाला होता. राहुलला बंगळुरू येथील लढतीनंतर संघातून वगळण्यात आले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरू कसोटीमध्ये त्याने ० व १२ अशा एकूण १२ धावा केल्या होत्या. उर्वरित मालिकेत तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये सहभागी नव्हाता.
दुसऱ्या बाजूला बंगळुरू कसोटीमध्ये ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाल्यानंतर ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे पूर्ण मालिकेत त्याला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या चार दिवसीय सामन्यामध्ये भारत अ संघाला कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारावा लागला होता.
या लढतीमध्ये साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी दमदार फलंदाजी तर मुकेश कुमारने भेदक गोलंदाजी करताना ६ बळी टिपले होते. लोकेश राहुल जर दुसऱ्या सामन्यात सहभागी झाला तर फॉर्म परत मिळविण्याबरोबर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्याशी जुळवून घेण्याची त्याच्याकडे चांगली संधी असणार आहे.