Aus A vs Ind A (2nd unofficial Test) :- गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ‘ऑस्ट्रेलिया अ’चा डाव २२३ धावत गुंडाळ्यात ‘भारत-अ’ ला यश मिळाले असले तरी दुसऱ्या डावात देखील फलंदाजानी हाराकिरी केल्याने ऑस्ट्रेलिया-अ व भारत अ यांच्या दरम्यान सुरु असलेल्या अनधिकृत कसोटीमध्ये भारताकडे केवळ ११ धावांची आघाडी शिल्लक आहे.
भारताचा पहिला डाव १६१ धावांमध्ये संपुष्टात आणल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी २ बाद ५३ अशी मजल मारली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा व खालील अहमद यांनी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
काल २६ धावांवर नाबाद असलेल्या मार्कस हॅरिसने आज अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाज चांगली साथ देऊ शकले नाहीत. भारतीय वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगलेच चाचपडत होते. मार्कस हॅरिसने ७४ धावांची खेळी करून बाद झाला. कोरी रॉकीसिलीने ३५, जिमी पीअरसनने ३० तर नॅथन मॅकअँड्रूने २६ धावांचे योगदान दिले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने ५० धावांमध्ये ४ तर मुकेश कुमारने ४१ धावांमध्ये ३ बळी घेताना ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत रोखला. खालील अहमदने २ फलंदाजाना तंबूत धाडले.
अभिमन्यू, राहुल स्वस्तात परतले
लोकेश राहुल व अभिमन्यू ईश्वरन या दोघांची निवड बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी झाली आहे. मात्र हे दोघेही पहिल्या डावात अनुक्रमे ४ व ० धावांवर बाद झाले होते. दुसऱ्या डावात देखील दोघांना विशेष काहीच करता आले नाही. दुसऱ्या डावात लोकेश राहुलने ४४ चेंडूत १० तर अभिमन्यू ३१ चेंडूत १७ धावांची खेळी करून परतले.
दोघेही बाद झाल्यानंतर साई सुदर्शन ३ तर कर्णधार ऋतुराज गायकवाड ११ तर देवदत्त पडीक्कल १ धावा करून बाद झाल्याने भारताचाही अवस्था ५ बाद ५६ अशी झाली होती. पहिल्या लढतीत दमदार अर्धशतक झळकावणारा ध्रुव जुरेल १९ तर नितीश कुमार रेड्डी ९ धावांवर खेळत आहेत.