Aus A vs Ind A (2nd unofficial Test,Day 1) : – भारत अ व ऑस्ट्रेलिया अ संघांदरम्यान सुरु असलेल्या अनाधिकृत कसोटीमध्ये भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा गडगडला. भारताचा पहिला डाव १६१ धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची देखील खराब सुरुवात झाली असून पहिल्या दिवसअखेर त्यांनी २ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली.
प्रथम फलंदाजी करताना मेलबर्नच्या उसळल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज स्थिरावू शकले नाही. तातडीने ऑस्ट्रेलियाला रवाना झालेल्या लोकेश राहुलने केवळ ४ धावा करताना तंबूचा रस्ता धरला. अभिमन्यू ईश्वरन (०), साई सुदर्शन (०), कर्णधार ऋतुराज गायकवाड (४) हे झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद ११ अशी झाली होती. त्यानंतर देवदत्त पडीक्कल व ध्रुव जुरेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. २६ धावांची खेळी करून पडीक्कल परतल्याने भारताची अवस्था ५ बाद ६४ अशी झाली होती.
ध्रुव जुरेलने एकहाती किल्ला लढवताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला नितीशकुमार रेड्डीने १६ तर प्रसिद्ध कृष्णाने १४ धावा करताना साथ देण्याचा प्रयन्त केला. मात्र जुरेल ८० धावांची खेळी करून बाद झाल्यानंतर भारताचा डाव झटपट संपला. मायकेल नेसरने ४, ब्यू वेबस्टरने ३ तर स्कॉट बोलँड, कोरी रॉकीसिली व नॅथन मॅकस्विनी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात मार्कस हॅरिस व कर्णधार नॅथन मॅकस्विनी यांनी करताना ३१ धावांची सलामी दिली. नॅथन मॅकस्विनी (१४) तर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (३) हे झटपट बाद झाले. दिवसअखेर सॅम कॉन्स्टास १ तर मॅकस्विनी २६ धावांवर खेळत आहेत.