“स्वतःला ‘आलमगीर’ म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा पराभव महाराष्ट्रात आणि…”; अमित शाहांचे विधान

Amit Shah | छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी असून यानिमित्त रायगडावर अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सोहळयाला उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गज नेते मंडळी देखील उपस्थित होते.
यावेळी शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शाह यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अमित शाह यांनी “शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत,” असे मत रायगडावरील ३४५व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात व्यक्त केले.
“जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी शिवरायांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आदिलशाही आणि निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात रूपांतरित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शिवाजी महाराजांच्या जन्मकाळात महाराष्ट्र अंधारात बुडाला होता, स्वधर्म आणि स्वराज्याबद्दल बोलणे गुन्हा मानले जात होते,” असे अमित शाह यांनी शिवरायांबद्दल सांगितले. Amit Shah |
“शिवरायांनी भगवा झेंडा फडकवण्याची आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. मी अनेक नायकांची चरित्रे वाचली, पण शिवरायांसारखे साहस आणि पराक्रम एकाही नायकात दिसले नाही,” असेही अमित शाह म्हणाले. Amit Shah |
रायगडावरून देशासाठी एक महत्त्वाकांक्षी संकल्प व्यक्त करताना शाह म्हणाले, “आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून संकल्प करत आहोत की, जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारत जगात क्रमांक एक वर असेल.”
शिवाजी महाराजांनंतरच्या काळात औरंगजेबाच्या आक्रमणांना मराठ्यांनी कसे तोंड दिले, याचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाविरुद्ध अथक लढा दिला. त्यामुळेच त्याची कबर याच मातीत बांधली गेली. मराठ्यांच्या या पराक्रमामुळे स्वराज्याचा गौरव कायम राहिला,” असे त्यांनी सांगितले. Amit Shah |
“स्वतःला ‘आलमगीर’ म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा पराभव महाराष्ट्रात”
“स्वतःला ‘आलमगीर’ म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा पराभव महाराष्ट्रात झाला आणि त्याची कबर देखील येथेच आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवलं गेलं पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. हात जोडून विनंती करतो. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे” असं अमित शाह म्हणाले.
हेही वाचा:
मायावतींचा राहुल गांधींवर हल्लाबोल! ‘वक्फ कायद्यावर गप्प का?’ ; बसपा सुप्रीमोचा सवाल”





